ऐतिहासिक वादाच्या कढीला राष्ट्रवादीकडून फोडणी! बड्या नेत्यांकडून बेधडक वक्तव्ये

मुंबई : सध्या राज्यातील सर्वच प्रश्न मिटल्याचे चित्र आहे. कारण आता केवळ वादंग होत आहेत ती केवळ ऐतिहासिक महापुरुषांवरूनच. भाजपाकडून महापुरुषांचा अवमान होत असल्याचे चित्र जरी असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस देखील यात मागे नाही, हे देखील स्पष्ट होते. त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अन्य बड्या नेत्यांचाही सहभाग आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल, शनिवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा एक व्हिडीओ ट्विटरवरून शेअर करत, राजभवनातील एका कार्यक्रमात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्या व्हिडीओमध्ये राज्यपालांनी कोणत्याही महापुरुषांचा अवमान केल्याचे आढळत नाही. यावरूनच बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आणि त्यांनी केंद्रीय मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरला.

त्याआधी, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील औरंगजेबाबद्दल असेच वादग्रस्त विधान केले. बहादूरगड येथे छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे फोडले, त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचे मंदिरही तोडले असते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल्यावर उठलेले वादळ अद्याप शमलेले नाही.

तर, हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधी महाविकास आघाडीकडून महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महामोर्चाचे आयोजन केले होते. पण अधिवेशन सुरू झाल्यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत महापुरुषांच्या अवमानांचा विसर सर्वांनाच पडला. शेवटच्या दिवशी आठवण झाल्याने हा मुद्दा केवळ उपस्थित करण्यात आला. पण जाता-जाता महाविकास आघाडीचेच ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महापुरुषांबद्दलचा नवा वाद निर्माण केला. ‘बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा, असे सांगतानाच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, अशी टिप्पणी त्यांनी केली आणि वाद निर्माण झाला. त्यामुळे ऐतिहासिक वादांच्या बुरुजाखाली वर्तमानातील प्रश्न दाबण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

भाजपाही विरोधकांच्या निशाण्यावर
राज्यपाल कोश्यारी यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा, भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यासह अन्य काही भाजपानेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी थेट राज्यपालांना हटविण्याची मागणी केली होती.