द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊनही शिवसेना दुर्लक्षितच, आजच्या मुंबईतील बैठकीचे निमंत्रण नाही

Draupadi Murmu

मुंबई : राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या १८ जुलै २०२२ रोजी होणार आहे. या निवडणुकीत रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तथापि, द्रौपदी मुर्मू या आज मुंबई येणार असून त्यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला दिले नसल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपासमवेत शिवसेनेची युती असल्याचे सांगत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० आमदार आहेत. मात्र, शिवसेनेच्या खासदारांमध्ये मात्र अद्याप फूट पडलेली नाही. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून खासदार फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला.

द्रौपदी मुर्मू या आज दुपारी मुंबईत येणार असून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी त्या मुंबई विमानतळानजीकच्या हॉटेल लीलामध्ये (अंधेरी, पूर्व) महाराष्ट्रातील खासदार आणि आमदारांच्या भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे गटासह लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांना यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. पण शिवसेनेला मात्र टाळले आहे.

विशेष म्हणजे, एकेकाळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी केंद्रीय नेते थेट मातोश्रीवर येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत असत. बाळासाहेबांनी देखील पक्षभेद बाजूला सारून व्यक्तीला महत्त्व देत दोनदा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता. शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यावर प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेबांचे आभारही मानले आहेत. पण यावेळी मात्र शिवसेना दुर्लक्षितच राहिली आहे.