घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023कांद्यावरुन विधान परिषदेत गदारोळ, कामकाज तहकूब; एकनाथ खडसेंनी महाजनांना करुन दिली आठवण,...

कांद्यावरुन विधान परिषदेत गदारोळ, कामकाज तहकूब; एकनाथ खडसेंनी महाजनांना करुन दिली आठवण, म्हणाले…

Subscribe

Maharashtra Council Live मुंबई – राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. कांद्याला अवघा दोन रुपये किलो भाव मिळत आहे. या स्थितीत शेतकऱ्यानं जगावं की मरावं अशी स्थिती निर्माण झाली. यावरुन महाविकास आघाडीचे आमदार आज आक्रमक झाले आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कांद्याच्या माळा गळ्यात घालून आमदारांनी सरकारच्या धोरणाचा विरोध केला. शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी विरोधीपक्षाकडून केली जात आहे. विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्याबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २८९ नुसार कांद्याच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. मात्र गदारोळामुळे काही मिनिटांतच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली, मात्र गदारोळामुळे आज दुसऱ्यांदा कामकाज तहकूब करावे लागले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापानावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांना देशद्रोही म्हटले आहे. त्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आक्रमक झाले. त्यासोबतच कांदा, कापूस प्रश्नावरुन विरोधकांनी चर्चेची मागणी केली. कांदा आणि कापसाला सहा ते सात हजार भाव मागणारे आणि त्यासाठी आमरण उपोषण करणारे गिरीश महाजन आज मंत्री आहेत. त्यावरुनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला.
२८९ नियमानुसारच सविस्तर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली.

- Advertisement -

महाजनांच्या उपोषणाची आठवण…
विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कांदा आणि कापूस प्रश्नावर सभागृहात चर्चेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) उपोषणाची आठवण सांगितली. कापसाला सहा ते सात हजार रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाजन
आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे महाजनांची स्थिती वाईट झाली. त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा धावा धरला. खडसे साहेब लवकर मुंडे साहेबांना घेऊन या, उपोषण सोडवा, असा आग्रह ते करु लागले होते. कांदा आणि कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी उपोषण करणारे तेच गिरीश महाजन आज देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून मंत्रिमंडळात मंत्री आहेत. तेव्हा त्यांनी आपल्या उपोषणाची आठवण ठेवून कांदा आणि कापूस प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, असा चिमटा एकनाथ खडसे यांनी काढला.

नाफेडकडून कांदा खरेदी सुरु – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

विरोधकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (DCM Devendra Fadanvis)  उत्तर दिले. ते म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर गंभीर संकट आलं आहे. देशातील कांद्याच्या एकूण उत्पादन करणाऱ्या राज्यांपैकी प्रमुख महाराष्ट्र आहे. मात्र सध्या नऊ राज्य कांद्याचे उत्पादन घेत आहेत. भारतातून साऊथ इस्ट देशांना मोठ्या प्रमाणत कांदा निर्यात केली जाते. मात्र या देशांमध्ये विदेशी चलन नाही, त्यामुळे या देशात निर्यात बंद आहे. त्यावर केंद्राशी बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा फडणवीसांनी केला. नाफेडकडून कांदा खरेदी सुरु केल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.
लाल कांदा, आणि छोटा कांदा असा कोणताही भेद खरेदीत केला जात नाही, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत यावर चर्चा झाली असून, राज्य सरकारने कांद्याची खरेदी करायला सुरुवात केली असल्याचंही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी विरोधीपक्षाकडून कांदा आणि कापसाच्या मुद्यावर गदारोळ सुरु झाला आणि विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले.

हेही वाचा : भर सभागृहात मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना शाब्दिक चिमटा; म्हणाले, आम्ही सढळ हस्ते मदत करतो!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -