शिंदे-फडणवीस सरकारला सत्तास्थापनेचे निमंत्रण नव्हते?; फडणवीस यांनी केला खुलासा

सत्तास्थापनेबाबतची कागदपत्रे राज्यपाल यांच्याकडे आहेत. ही कागदपत्रे राजभवन कार्यालयाकडे नाहीत. न्यायालयात याची सुनावणी सुरु आहे. त्यामुळे त्याची कागदपत्रे सुरक्षितरित्या राज्यपाल यांच्याकडे ठेवण्यात आली आहेत, असे उत्तर राजभवन कार्यालयाने दिले आहे. आम्हाला सत्तेसथापनेसाठी निमंत्रण होते, असा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

नवी दिल्लीः आम्हाला सत्तास्थापनेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून निमंत्रण होते. त्याची कागदपत्रे राजभवन कार्यालयाकडे नाहीत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे ती कागदपत्रे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली येथे बैठक पार पडली. त्यानंतर उभयंतांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना माध्यमाच्या प्रतिनिधीने प्रश्न विचारला. सत्तास्थापनेसाठी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कोणतेही लेखी निमंत्रण नव्हते, अशी माहिती माहितीच्या अधिकारात मागितलेल्या उत्तरात मिळाली आहे. यावर तुमचे काय मत आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाचे उत्तर मी देतो, असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तुम्ही जी बातमी चालवली आहे त्याचे उत्तर मी देतो. राजभवन कार्यालयाने माहितीच्या अधिकारात उत्तर दिले आहे. सत्तास्थापनेबाबतची कागदपत्रे राज्यपाल यांच्याकडे आहेत. ही कागदपत्रे राजभवन कार्यालयाकडे नाहीत. न्यायालयात याची सुनावणी सुरु आहे. त्यामुळे त्याची कागदपत्रे सुरक्षितरित्या राज्यपाल यांच्याकडे ठेवण्यात आली आहेत, असे उत्तर राजभवन कार्यालयाने दिले आहे. आम्हाला सत्तेसथापनेसाठी निमंत्रण होते, असा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने माहितीच्या अधिकाराखाली राजभवनकडून ही माहिती मागितली होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांना सत्तेस्थापनेसाठी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून निमंत्रण नव्हते, असा दावा राजभवनकडून मिळालेल्या उत्तराच्या आधारावर करण्यात आला होता. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करुन या दाव्यावर पडदा पाडला.

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय मंत्री शाह यांना भेटायला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. या बैठकीची विस्तृत माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ही बैठक केवळ साखर उद्योगाला व सहकार विभागाला चालना देण्यासाठी होती. याविषयावर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री शाह यांनी याबाबत सकारात्मक योजना सुचवल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्याची अंमलबजावणी होईल. या बैठकीत राज्यपाल व मंत्रिमंडळ विस्ताराची कोणतीच चर्चा झाली नाही. पण मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील निर्यातीचा कोटा वाढविण्यावरही केंद्रीय मंत्री शाह यांच्यासोबत चर्चा झाली. ते याबाबत सकारात्मक आहेत. २६ जानेवारीसाठी आम्ही सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवली आहे. आम्ही अर्लट आहोत.

मी वळसे पाटील यांच्यावर आरोप केले नाहीत- फडणवीस

मला अटक करण्याचा महाविकास आघाडी सरकारने कट रचला होता, असा दावा फडणवीस यांनी केला. मात्र असा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचा खुलासा माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले, मी वळसे-पाटील यांच्यावर आरोप केलेला नाही. हा प्रयत्न नक्कीच त्यांनी केलेला नाही. त्यांना वरून फोन आला होता.

चार पाच महिन्यांपासून राज्यपालांची तयारी

गेल्या चार पाच महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी ही निवृत्तीबाबत बोलत आहेत. प्रकृती साथ देत नाही. मला परत घरी जाऊ द्या, असे राज्यपाल कोश्यारी सांगत होते. आता तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्तीसाठी पत्र लिहिले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अमित शाह यांचे मराठीतून ट्विट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. बैठकीत साखर कारखानदारी व सहकार क्षेत्राबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे मराठीतून ट्विट केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले.