घरराजकारणराष्ट्रपती निवडणूक : शिवसेना हॅटट्रिक साधणार का? मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शक्यता

राष्ट्रपती निवडणूक : शिवसेना हॅटट्रिक साधणार का? मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शक्यता

Subscribe

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाने उठाव करत शिवसेनेला धक्का दिल्यानंतर पक्षफुटीचे लोण राज्यस्तरावर पसरले. आता ते राजधानी दिल्लीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राष्ट्रपती निवडणुकीच्या (President Election) निमित्ताने हॅटट्रिक साधत शिवसेना (Shiv Sena) या बंडखोरांना धक्का देऊ शकते, असे तर्क वर्तविला जात आहे.

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असताना 2007च्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी वेगळा निर्णय घेतला होता. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. प्रतिभा पाटील या राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या महिला उमेदवार असण्याबरोबरच त्या मराठी असल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताईंना समर्थन दिले होते. त्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते भैरोसिंह शेखावत हे रालोआचे उमेदवार होते. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘मातोश्री’वर जाऊन पाठिंब्याबद्दल शिवसेनाप्रमुखांचे आभारही मानले होते. या निवडणुकीत प्रतिभाताई विजयी झाल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक, उद्धव ठाकरे धक्कातंत्राचा अवलंब करणार?

त्यानंतर 2012मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात जाऊन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले होते. या निवडणुकीत संपुआतर्फे प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) तर रालोआचे उमेदवार म्हणून पी ए संगमा उभे होते. या निवडणुकीत देखील प्रणव मुखर्जी विजयी झाले होते. शिवसेनेच्या पाठिंब्याचे आभार मानण्यासाठी प्रणव मुखर्जी यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.

- Advertisement -

तर आता शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि खासदार राजेंद्र गावित यांनी रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. शिवाय, याच मुद्द्यावरून लोकसभेत शिवसेना खासदारांमध्ये मोठी फूट पडण्याची चर्चा देखील आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी 19पैकी 14 खासदार लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते.

तथापि, राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहूनही वेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आता रालोआशी फारकत घेतली आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमवेत महाविकास आघाडी केली असली तरी, शिवसेना ही संयुक्त पुरोगामी आघाडीत सहभागी झालेली नाही. त्यामुळे बाळासाहेबांचेच वारसा सांगणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध भूमिका घेऊन द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करतील आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हॅटट्रिक तर साधतीलच, पण त्याचबरोबर कथित बंडखोरीच्या तयारीत असलेल्या खासदारांनाही धक्का देतील, अशी दाट शक्यता आहे.

हेही वाचा – नवाबसेनेच्या पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’; मनसेची उद्धव ठाकरेंच्या पत्रावर टीका

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -