घरराजकारणठाकरेंवर टीका करतानाच गजानन कीर्तिकरांकडून संजय राऊतांची पाठराखण

ठाकरेंवर टीका करतानाच गजानन कीर्तिकरांकडून संजय राऊतांची पाठराखण

Subscribe

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी केलेल्या बहुतांश नेत्यांच्या मनात खासदार संजय राऊत यांच्याबद्दल अढी आहे. मात्र आत्ताच शिंदे गटात दाखल झालेले ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडतानाच संजय राऊत यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केलेल्या खासदार संजय राऊत यांची 103 दिवसांनी जामीनावर सुटका झाली. त्यानंतर संजय राऊत यांचा आक्रमकपणा लक्षात घेता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष आणखी तीव्र होईल, असे चित्र होते. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा झटका होता. तथापि, खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई चुकीचीच होती, असे वक्तव्य करून त्यांनी शिंदे गटालाच घरचा अहेर दिला.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांचा जामीन करताना पीएमएलए कोर्टाने ईडीवर ताशेरेही ओढले होते. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना विनाकरण अटक करण्यात आली. ही अटक बेकायदा असल्याचे मत न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी नोंदवले होते. त्याला गजानन कीर्तिकर यांनी दुजोरा दिला. संजय राऊत यांच्यावरील आरोप फार किरकोळ आहे. त्यामुळे न्यायालयाचे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. कोर्ट चुकलेले नाही, असे कीर्तिकर म्हणाले.

त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपद असूनही आम्हाला दुय्यम स्थान मिळाले. शिवसेनेच्या हाती काही लागले नाही, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना बळ मिळत होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेला उठाव हा योग्यच होता, असे ते म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी 2004 साली माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. पण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी तसे काही केले नाही, त्यांनी मला चार वेळा तिकीट दिले, असे कीर्तिकर म्हणाले. पण 2009 साली माझी तिकीट कापलेच. त्यानंतर 2014 आणि 2019 साली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असताना एक मंत्रिपद मिळाले होते. तेही अरविंद सावंत यांना दिले. गटनेतेपदाच्या बाबतीतही डावलले. हे सगळे अपमानास्पद होते, त्यामुळे मी शिंदे गटात गेलो, असे कीर्तिकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -