विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड झालेले राहुल नार्वेकर कोण आहेत?

2019 मध्ये राहुल नार्वेकर पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत. हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष झाले असून त्यांना वयाच्या 45 व्या वर्षीच अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे सरकारची आज पहिल्या विजयाची नोंद केली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने- सामने होते. त्यात राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि 30 जूनला भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने सरकार स्थापन केले. त्यानंतर तीनच दिवसांनी या सरकारला पहिल्या चाचणीला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला परवानगी दिली. राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता. तर राजन साळवी यांच्यासाठी काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी प्रस्ताव मांडला. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत 164 मतांनी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. तर, राजन साळवी यांना आघाडीची 107 मते मिळाली.

कोण आहेत राहुल नार्वेकर ?
राहुल नार्वेकर यांचे शिक्षण पदवीधर (LLB) आहे. 2019 मध्ये राहुल नार्वेकर पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत. हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष झाले असून त्यांना वयाच्या 45 व्या वर्षीच अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. राहुल नार्वेकरांचा अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांचा त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यांनी संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

शिवसेनेतून राजकारणाला झाली होती सुरूवात
राहुल नार्वेकरांची राजकारणातील मूळ सुरूवात शिवसेनापक्षातून झाली होती. त्यांना आदित्य ठाकरेंचा सर्वात जवळचे समजले जात होते.शिवसेना पक्षातील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेनंतर राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. विधानसभा अध्यक्षपदाची निवड झालेल्या नार्वेकरांचा भाजपा हा तिसरा पक्ष आहे.