घररायगडकोकण शिक्षक मतदार संघासाठी ९३.५६ टक्के मतदान; महाविकास आघाडी आणि भाजपाच्या उमेदवांरामध्ये...

कोकण शिक्षक मतदार संघासाठी ९३.५६ टक्के मतदान; महाविकास आघाडी आणि भाजपाच्या उमेदवांरामध्ये लढत

Subscribe

कोकण शिक्षक मतदार संघासाठी रायगड जिल्ह्यात आज शांततेत मतदान पार पडले. सुमारे ९३.५६ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील आणि भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्येच खरी सरळ लढत होत असल्याने विजयी गुलाल कोण उधळणार याकडचे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अलिबाग: कोकण शिक्षक मतदार संघासाठी रायगड जिल्ह्यात आज शांततेत मतदान पार पडले. सुमारे ९३.५६ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील आणि भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्येच खरी सरळ लढत होत असल्याने विजयी गुलाल कोण उधळणार याकडचे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळी ८ वाजल्यापासून रायगड जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रीयेला सुरुवात झाली. सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत १६.९३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर १२ वाजेपर्यंत ४८.७८ टक्के मतदान झाले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ७३.९६ टक्के मतदान झाले होते. दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे नऊ हजार ४५० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज आहे. त्यामध्ये चार हजार १४३ पुरुष शिक्षक तर पाच हजार ३०७ महिला शिक्षक मतदारांचा समावेश आहे.
शिक्षकांनी आपला आमदार निवडण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षकांनी आपला आमदार निवडण्यासाठी आज उस्फूर्तपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये प्रामुख्याने महिला शिक्षकांचा सहभाग अधिक होता. मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर महाविकास आघाडी आणि भाजपाने मतदारांच्या माहितीसाठी टेबल उभारले होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.
या मतदारसंघासाठी एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे, धनाजी नानासाहेब पाटील (जनता दल युनायटेड), उस्मान इब्राहीम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष), रमेश नामदेव देवरुखकर (अपक्ष), बाळाराम दत्तात्रय पाटील (अपक्ष) आणि रंतोष मोतीराम डामसे (अपक्ष) असे एकूम आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मतदारसंघात एकूण ३७ हजार शिक्षक मतदार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक १४ हजार ९९५, रायगड मधील १० हजार ०८७, पालघर मधील ६ हजार ७१८, रत्नागिरी मधील ४ हजार ०६९ तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील २ हजार १६४ मतदारांचा समावेश आहे. मतदारांची संख्या जास्त असल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारांचा कौल महत्वपुर्ण ठरणार आहे. त्यामुळे शेकापने रायगड मधील तर भाजपने ठाणे जिल्ह्यातील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याचे दिसून आले.
काही अपवाद वगळले तर या मतदान संघावर कायम भाजप प्रणित शिक्षक परिषदेचा वरचष्मा राहीला आहे. सुरवातीला प्रभाकर सावंत, त्यानंतर वसंत बापट, सुरेश भालेराव, रामनाथ मोते शिक्षक परिषदेकडून या मतदारसंघातून निवडून आले होते. वसंत बापट आणि रामनाथ मोते यांनी प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकापने भाजपचे संस्थानाला सुरुंग लावत पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेवर काम करणारे बाळाराम पाटील पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यामुळे शेकापने खालसा केलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे विजयाची माळ कोण गळ्यात घालणार हे २ फेब्रुवारी रोजी होणार्‍या मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.

नागोठणेत ९५.१८ टक्के मतदान
नागोठणे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळा क्रमांक १, चेरी शाळा येथे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी एकूण ९५.१८ टक्के इतके मतदान झाले. दरम्यान या केंद्रास रोहे तहसिलदार कविता जाधव तसेच आमदार अनिकेत तटकरे यांनी भेट दिली. नागोठणे केंद्रामध्ये एकूण ३९५ मतदार असून त्या पैकी ३७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदार १९८ आणि स्त्री मतदार १७८ असे एकुण ३७६ मतदारांनी मतदान केल्याने मतदान केंद्रात एकुण ९५.१८ % मतदान झाल्याची माहिती मतदान केंद्र प्रमुख प्रकाश म्हेत्रे यांनी दिली. पोलिस निरीक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

- Advertisement -

मुरुडमध्ये ९७.७७टक्के मतदान
मुरुड येथे तहसीलदार कार्यालयात सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.या मतदान प्रक्रियेत मुरूड तालुक्यातील शिक्षक ११९तर शिक्षिका १०७ यांनी यांनी मतदान केले. ९७.७७टक्के मतदान झाले असून आठ उमेदवार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीसाठी तहसीलदार रोहन शिंदे, सुक्ष्म निरीक्षक अमोल गडाख, केंद्राध्यक्ष गोविंद कोटंबे, मतदान अधिकारी विजय महापुस्कर, सचिन राजे, निलेश भिंगारे तसेच मतदान कर्मचारी धर्मा म्हात्रे आदिंसह अन्य अधिकारी उपस्थित होते. येत्या गुरुवारी मतमोजणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -