आरोग्यवर्धक, बहुगुणी, वैशिष्ठ्यपूर्ण रानमेव्याची लयलूट 

बहुविध वृक्षराजीने समृद्ध असलेल्या जिल्ह्यातील रानावनात करवंद, जांभूळ, तोरण, भोकर, आळू, जाम, कोकम, रांजण आदी विविध प्रकारचा रानमेवा दाखल झाला आहे. हे खाण्यासाठी खवय्ये त्यावर तुटून पडत आहेत. त्यांना जणू काही मेजवानी मिळत आहे. अवकाळी पावसाचा फटका बसूनही रानमेव्याने काही प्रमाणात तग धरला आहे. त्यामुळे यंदा प्रमाण कमी असले तरी खवय्यांची हिरमोड मात्र झालेला नाही.अवकाळी पावसामुळे रानमेव्याचे उत्पादन घटले आहे. मात्र सध्या आदिवासी बांधव राहिलेला रानमेवा बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. या पारंपारिक व्यवसायातून आदिवासी महिलांना यातून चांगला रोजगार देखील मिळतो.

पाली: बहुविध वृक्षराजीने समृद्ध असलेल्या जिल्ह्यातील रानावनात करवंद, जांभूळ, तोरण, भोकर, आळू, जाम, कोकम, रांजण आदी विविध प्रकारचा रानमेवा दाखल झाला आहे. हे खाण्यासाठी खवय्ये त्यावर तुटून पडत आहेत. त्यांना जणू काही मेजवानी मिळत आहे. अवकाळी पावसाचा फटका बसूनही रानमेव्याने काही प्रमाणात तग धरला आहे. त्यामुळे यंदा प्रमाण कमी असले तरी खवय्यांची हिरमोड मात्र झालेला नाही.अवकाळी पावसामुळे रानमेव्याचे उत्पादन घटले आहे. मात्र सध्या आदिवासी बांधव राहिलेला रानमेवा बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. या पारंपारिक व्यवसायातून आदिवासी महिलांना यातून चांगला रोजगार देखील मिळतो.
केवळ याच हंगामात मिळणारी करवंद व जांभळे बाजारात आली आहेत. आकाराने मोठ्या जांभळे व करवंदाना मागणी आहे. मधुमेहावर जांभळे अतिशय गुणकारी आहेत. आदिवासी महिला व पुरुष रानातून ही जांभळे व करवंद गोळा करून टोपलीत घेऊन तालुक्याच्या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मागील वर्षी १० रुपयांना मिळणारा वाटा आता २० रुपये झाला आहे. तरीही खवय्ये आवर्जून विकत घेत आहेत. रानामध्ये जाऊन करवंदाच्या जाळीतून करवंद काढणे हा काही वेगळाच आनंद असतो.
गुलाबी लाल रंगाची गोड तोरण सर्वच जण आवडीने खातात. खाण्यास पिठूळ असतात. सध्या बाजारात तोरण कमी दिसत आहेत. त्याच्या बियाही भाजून खाल्ल्या जातात. हिरड्या व दात दुखीवर त्याचा चांगला फरक पडतो. रांजण ही पिवळ्या रंगाची लहान फळे असतात. खाण्यासाठी मधुर असतात. त्यामध्ये बारीक बी असते मात्र रांजणाची झाड देखील कमी होत चालली आहेत. त्याच्यामुळे रांजण खाण्यास सर्वत्र उपलब्ध होत नाहीत.

भोकराचे फळ बहुपयोगी
हिरव्या कच्चा भोकरांची भाजी करतात, तर पिकलेली पांढरट पिवळी भोकरे खातात. भोकर खाण्यास चिकट असतात. सध्या भोकरांची झाडे कमी होत चालली आहेत. भोकराचे फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. फळ मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्र नलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ, जखम ुजणवा व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही भोकराचे फळ उपयोगी आहे.

कोकम, रातांबा आणि अळूच्या झाडाची पानं
जिल्ह्यात सर्वत्र कोकमाची झाडे आढळतात. श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड या किनारपट्टी तालुक्यात अधिक कोकमाची झाडे आहेत. आरोग्यवर्धक कोकमाचा रस केला जातो, सुकवून भाजीत किंवा मासळीच्या रस्यात खातात, कोकमाची आणखीही बरेच उपयोग होतात. तर अळूच्या झाडाची पानं ही पेरूच्या झाडासारखी असतात. त्यावर अळूची गोल-गोल फळं लागतात. ती दिसायला चिक्की सारखी असतात. मात्र तेलकट दिसतात. त्यांची चव आंबट-गोड असते. पाऊस पडला की फळांमध्ये बारीक अळ्या पडतात. त्यामुळे उन्हाळ्यातच ही फळे खाल्ली जातात. अनेकजण वाळवून देखील ठेवतात.

अनेकांना उपयोगी रानमेवा
रानात, जंगल व गाव यांच्या सीमेवरील मोकळ्या जागेमध्ये आणि जंगला जवळील वस्त्यांत किंवा शेतमळ्यात कोणतीही लागवड, मशागत किंवा खास देखभाल न करता नैसर्गिकरित्या उगवणार्‍या व वाढणार्‍या वनस्पतींवर पिकणारी फळे. या रानफळांमधून या आदिवासींना व जंगलातल्या प्राण्यांना शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे, प्रथिने, लोह व कॅल्शियम मिळत असते. तसेच आदिवासी समाजासाठी हे महत्वाचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. रानमेवा ज्या प्रदेशात उगवतो त्या प्रदेशातील जैवविविधतेचे प्रतिनिधित्व देखील करतो.

या विशिष्ट हंगामात मिळणार्‍या रानमेव्याचा बच्चेकंपनी आणि मोठी माणसेही आवर्जून आनंद घेतात. जिल्ह्यात हे विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. रानमेव्याचे संवर्धन तसेच जतन झाले पाहिजे.
– सोनिया माळी, तरुणी