अल्पवयीन मुलावर अत्याचार; सुधागडमध्ये उत्स्फूर्त बंद

सुधागड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलावर पालीतील अब्दुल कबले हा ५० वर्षीय इसम २ महिने भूल देऊन अनैसर्गिक शारीरिक अत्याचार करत होता. ही बाब नुकतीच समोर आल्याने कबले याच्या विरोधात पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सुधागड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व हिंदू समाजाच्या वतीने पालीतून मूक मोर्चा देखील काढण्यात आला.

पाली: सुधागड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलावर पालीतील अब्दुल कबले हा ५० वर्षीय इसम २ महिने भूल देऊन अनैसर्गिक शारीरिक अत्याचार करत होता. ही बाब नुकतीच समोर आल्याने कबले याच्या विरोधात पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सुधागड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व हिंदू समाजाच्या वतीने पालीतून मूक मोर्चा देखील काढण्यात आला. हा मूक मोर्चा पाली शहरात बल्लाळेश्वर गणपती मंदिर ते तहसील कार्यालय येथून शिव स्मारक असा काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिक सहभागी झाले होते. पाली, परळी, पेडली या महत्वाच्या बाजारपेठा तसेच इतर ठिकाणी देखील कडकडीत बंद पाळण्यात आला.

मुस्लिम समाजाची कारवाईची मागणी व मोर्चाला पाठींबा
मुस्लिम समाजाच्या वतीने शनिवारी पाली पोलीस स्थानकात संबंधित इसमावर कठोर कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच पालीतून काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला देखील मुस्लिम समाजाच्यावतीने पाठिंबा दर्शवण्यात आला.

पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. पुरावे गोळा करून पूर्ण क्षमतेने न्यायालयापुढे ठेवले जातील. सुधागड तालुक्याला सलोखा आणि शांततेची परंपरा आहे. समस्त नागरिक ही परंपरा तशीच पुढे चालू ठेवतील याची खात्री आहे. समाज माध्यमांवर अफवा पसरवून सामाजिक तेढ निर्माण करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– विश्वजीत काईंगडे,
पोलीस निरीक्षक, पाली