HomeरायगडAccident : रायगडमध्ये गाड्या जळण्याचे सत्र, खोपोलीजवळ टँकर आणि वीरजवळ कार पेटली

Accident : रायगडमध्ये गाड्या जळण्याचे सत्र, खोपोलीजवळ टँकर आणि वीरजवळ कार पेटली

Subscribe

खोपोलीतील शिळफाट्याजवळ दुर्घटना

खोपोली : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव टँकरचा चालकाच ताबा सुटल्यामुळे टँकर विद्युतवाहिणीच्या डीपीला धडक देऊन उलटला. त्यानंतर केमिकल गळती होऊन टँकरने पेट घेतला. चालक आणि साथीदाराने उडी मारल्याने त्यांचे जीव वाचले. मात्र, टँकर पेटला आणि या आगीत रस्त्याजवळ उभी केलेली कार आगीत खाक झाली. बुधवार (25 डिसेंबर) सकाळी साडेसहा वाजती ही दुर्घटना घडली.

मुंबई-पुणे महामार्गावरून केमिकलने भरलेला टँकर मुंबईकडे जात होता. बोरघाटातून उतरल्यानंतर शिळफाट्याजवळ टँकर आलेला असतानाच वाहनचालकाचा ब्रेकवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे डीपीला धडक देत टँकर उलटला. त्यामुळे त्यातील अल्कोहोल रस्त्या शेजारील गटारातून वाहत साधारणता 500 मीटरपर्यंत गेले आणि टँकर पेटला. ही आग विझवण्यासाठी खोपोली नगरपरिषद, टाटा स्टील, आलाना कंपनी, जेएसडब्ल्यू, गोदरेज, आयआरबी, एमएसआरडीसीची देवदूत यंत्रणा या कंपन्यांच्या अग्निशमनच्या यंत्रणांनी प्रचंड प्रयत्न केले. खोपोली पोलीस, अपघातग्रस्त टीमने रस्त्यावर माती टाकली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे केमिकल एक्सपर्ट आणि टीमनेही केमिकलची तिव्रता पाहून आग विझवण्यासाठीचे मार्गदर्शन केले.

तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यांनतर अपघातग्रस्त टँकर बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

गाडी पेटण्याची ३ दिवसांतील तिसरी घटना

महाड : धावणारी बस पेटण्याची घटना होऊन तीन दिवस उलटत नाहीत तोच मुंबई-गोवा महामार्गावर गाडी पेटण्याची दुसरी दुर्घटना घडली आहे. वीर गावाजवळ अलिबागहून मालवणकडे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. कारमधील तिन्ही प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. मात्र, या दुर्घटनेत कार खाक झाली.
चेतन ढोबळे, हिमांशू तिवारी आणि मल्हार निकम हे तिघेही पुण्याहून कोकण पर्यटनासाठी आले होते. बुधवारी (25 डिसेंबर) सकाळी 6 वाजता त्यांची कार (एमएच-12-जेएन-6868) महाड तालुक्यातील वीर गावाच्या हद्दीत होती. अचानक कारने पेट घेतला. तिघेही लगेचच गाडीतून बाहेर पडले. गाडी पेटल्याची खबर नगर पालिकेला दिल्यानंतर त्यांचा बंब येईपर्यंत कार जळून खाक झाली होती.

विशेष म्हणजे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास खापरोबा ट्रॅव्हल्सची एसी स्लीपर कोच (एमएच-47-एएस-6003) मुंबईतील जोगेश्वरीहून मालवणला जाता होती. मध्यरात्री म्हणजेच 12 वाजण्याच्या सुमारास ही बस कोलाडमधून पुढे जात असताना कोलाड रेल्वे पुलाजवळ बस येताच अचानक बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला. चालकाने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागून पेट घेतल्याचे दिसले. चालकाने लगेचच सर्व प्रवासांना सावध केले आणि उतरवले. त्यानंतर काही वेळातच आगीचा मोठा भडका उडाला. तत्पूर्वी बसमधील सर्व 34 प्रवासी उतरल्याने मोठी जीवितहानी टळली.

(Edited by Avinash Chandane)