HomeरायगडAccident : खालापूर दुर्घटनेप्रकरणी यूपीमधून दोघांना अटक, कंपनीमालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी...

Accident : खालापूर दुर्घटनेप्रकरणी यूपीमधून दोघांना अटक, कंपनीमालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप आक्रमक

Subscribe

खोपोली : खालापूर तालुक्यातील उंबरे गावाजवळील समराज कंपनीचा मातीभराव सुरू असताना संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत 6 कामगार जखमी झाले होते. ही घटना 5 डिसेंबर रोजी घडली. जखमी कामगारांपैकी दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत भाजप आक्रमक झाली असून कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी तहसीलदार आणि पोलिसांकडे केली आहे. एवढेच नाही तर गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.

समराज कंपनीत मातीचा भराव टाकतानाच काँक्रिटची भिंत बांधण्याचे काम सुरू होते. 5 डिसेंबर रोजी काम सुरू असताना भिंत खचली आणि सहा कामगार भिंतीखाली अडकले. या जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, धर्मदेव कुमार (25) आणि मनजित समर बहादूर यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यानंतर कंपनीवर गंभीर आरोप होत आहेत. कंपनीने केलेला मातीचा भराव आणि केलेले उत्खनन बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपचे विधानसभा युवामोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केला आहे. तसेच कंपनीने अल्प रॉयल्टी भरून मोठ्या प्रमाणात उत्खनन व भराव करून सरकारचा कोट्यवधींचा कर बुडवला आणि मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचे काम कंपनीने केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा…  Raigad News : नागोठण्यात भीषण दुर्घटना, गॅस दुरुस्त करताना आग लागून तिघे गंभीर जखमी

- Advertisement -

समराज कंपनीने केलेले बांधकाम आर्किटेक्ट प्लानशिवाय केल्याने दुर्घटनेमुळे समोर आले आहे. त्यामुळे या दुर्घटनेला कंपनी मालक जबाबदार असून कंपनीच्या मालकावर निष्पाप कामगारांचा बळी घेतल्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी खालापूर भाजपने केली आहे. त्याचवेळी मालकावर गुन्हा दाखल न केल्यास तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी इशारा प्रसाद पाटील यांनी पोलिसांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

त्या दिवशी काय घडलं?

या दुर्घटनेमधील मुकादम प्रमोदकुमार अवधेश आणि पोकलेनचालक जीतेंद्र मुखराम राजभर यांना पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. उंबरेतील समराज कंपनीत काँक्रिटची भिंत बांधण्याचे काम सुरू असताना या भिंतीजवळ पोकलेनने भराव टाकू नका, अशी विनवणी कामगारांनी केली होती. मात्र, या मागणीला न जुमानता मुकादम आणि पोकलेनचालक यांनी भराव टाकणे सुरूच ठेवले. त्यातच पोकलेनच्या धक्क्याने भिंत कोसळली आणि दोन मजुरांचा मृत्यू झाला. त्यांतर प्रमोदकुमार आणि जीतेंद्र राजभर फरार झाले होते.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -