अलिबाग : पावसाळा संपून जेमतेम दोन महिने झालेत. मात्र, अलिबागच्या खारेपाटातील गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या उग्र होऊ लागली आहे. जलजीवन मिशन योजना अयशस्वी ठरल्याने आणि एमआयडीसीच्या जलवाहिनी कोरड्याठाक पडल्याने गावांमध्ये पाण्याअभावी संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे मानकुळेमधील शेकडो महिला आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढून पाण्याची मागणी केली.
जलजीवन मिशनमुळे गावांमधील पाणीटंचाईला पूर्णविराम मिळणार असून पाण्यासाठी वणवण थांबणार, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मानकुळेमधील महिला, ग्रामस्थांना आजही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अलिबाग तालुक्यातील मानकुळे, बहिरीचापाडा, नारंगीचा टेप, बंगला बंदर, गणेशपट्टी ही गावे खाडीकिनारी आहेत. येथील रहिवासी मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत आहेत. सुमारे साडेतीन हजार लोकवस्ती असलेल्या या गावांमधील लोकांना पाणी देण्यासाठी एमआयडीसीद्वारे तीन टाक्या बांधण्यात आल्या. शिवाय लाखो रुपयांच्या जलजीवन योजनेचे काम सुरु आहे. जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. मात्र, अजून पाण्याचा थेंबही या ग्रामस्थांना मिळालेला नाही.
हेही वाचा… MBBS Paper Leaked : एमबीबीएसचा पेपर परीक्षेच्या आधीच सोशल मीडियावर व्हायरल; नेमकं काय घडलं ?
या भागात एमआयडीसीच्या आठ लाईन आहेत. मात्र, पाण्याचा थांगपत्ताच नाही. एमआयडीसीचे पाणी वेळेवर येत नाही. त्यामुळे रात्री ८ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत पाण्याची वाट पाहावी लागते. एक हंडा पाण्यासाठी तासभर प्रतीक्षा करावी लागते. पाण्यासाठी रात्ररात्र जागवावी लागत असल्याने महिलांमध्ये प्रचंड संताप आहे. पाण्याचे नळ गावापासून एक किलोमीटरवर असल्याने महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे महिलांना रात्रीच्यावेळी पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्नदेखील पुढे आला आहे. मानकुळे येथे पाण्याच्या अनेक योजना राबवण्यात आल्या.काही महिन्यांपूर्वी जलजीवन योजनेचे काम करण्यात आले. मात्र, पाण्याचा पत्ता नाही.
हेही वाचा… Vastu Tips : तिजोरीत ठेवा कमळाचे फूल, आर्थिक चणचणी होतील दूर
त्यामुळे मानकुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून शेकडो महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. आताच पावसाचा हंगाम संपला ही अवस्था होत असेल तर उन्हाळ्यात किती हाल होतील, असा सवाल महिला उपस्थित करत आहेत.
(Edited by Avinash Chandane)