घररायगडअलिबाग नगर परिषदेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

अलिबाग नगर परिषदेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

Subscribe

अलिबाग नगर परिषदेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

नगर परिषदेच्या सन 2020-21 चा सुधारित आणि सन 2021-22 चा कोणताही करवाढ नसलेला 44 कोटी 76 लाखांचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेमध्ये मंजूर करण्यात आला.
महसुली, भांडवली, तसेच इतर उत्पन्नातून 44.76 कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून, त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामाचे अनुदान, जिल्हा नगरोत्थान, 15 वा वित्त आयोग यातून निधी अपेक्षित आहे. खर्चाच्या बाजूचा विचार करता शहरातील आवश्यक त्या सर्व कामांचा समावेश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे.

आरोग्य सुविधा, तसेच नैसर्गिक आपत्तीकरिता अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. शहरामध्ये सुरक्षिततेच्या कारणासाठी सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, त्याकरिता सहा कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे शहरात येणाच्या पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण असणार्‍या आंग्रे समाधीच्या ठिकाणी लाईट अँड साऊंड शोसाठी 5 कोटी, नवीन रस्त्याकरिता 1 कोटी 35 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेवरही आवश्यक पुरेशी तरतूद असून, घनकचरा व्यवस्थापनासाठी 1 कोटी 20 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोळीवाडा आणि ब्राह्मण आळीमध्ये स्वतंत्र पाणी साठवण टाकी बांधण्यात येणार आहे. दुर्बल घटकांकरिता अर्थसंकल्पात 40 लाख, तर अंध-अपंग नागरिकांसाठी 24 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. महिला बालकल्याण विभागासाठी 40 लाख, उर्दू शाळा इमारत 70 लाखांची तरतूद असून, सिद्धार्थनगरमध्ये वाल्मिकी समाज मंदिर उभारण्यात येणार आहे. मीना बाजारची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे.
यावेळी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद वाकडे, सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक उपस्थित होते. शहराच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची भावना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -