अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; नागोठण्यात पूर, बस स्थानक पाण्याखाली

Amba river crosses Danger level 12 july 2022 rain update Flood in Nagothana, bus stand under water

रायगड जिल्ह्यातील  नागोठण्यातील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले आहे. पुरामुळे शहरात येणारे तीनही मुख्य रस्ते बंद झाले आहेत. प्रवाशांची वर्दळ असणारे एसटी बस स्थानकात पाणी असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने नदी किनारी असलेल्या छोट्या व्यावसायिकांची धांदल उडाली असून, अन्य दुकानदारांनीही खबरदारी घेतली आहे.

गेले काही दिवस सतत पडणार्‍या पावसाबरोबरच रविवारी, सोमवारी दिवस- रात्र शहरासह डोंगर माथ्यावर पडलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि पुराचे पाणी एसटी बस स्थानक, विभागीय शिवसेना शाखेच्या मागे, श्री मरिआई मंदिरासमोरील परिसर, मटण मार्केटची मागील बाजू, हॉटेल लेक व्ह्यू आणि सरकारी विश्रामगृहाच्या समोरील रस्त्यावर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात मोठ्या प्रमाणात शिरले. त्यामुळे स्थानकाशेजारील आणि शिवाजी चौकातील छोटे टपरीधारक आणि इतर दुकानदारांनी आपल्या दुकांनातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली.

तसेच शहरात येणारे तीनही ठिकाणचे मुख्य रस्ते बंद झाल्याने, तसेच स्थानकात पाणी असल्याने प्रवासी वाहतुकीसह इतर वाहतूक महामार्गावरून वळविण्यात आली असून, एसटीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तात्पुरत्या स्वरुपाचा थांबा देण्यात आला आहे. एसटीने कामानिमित्त प्रवास करणारे प्रवासी स्थानकात, तसेच महामार्गाकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी असल्याने महामार्गाकडे जाण्यासाठी श्री जोगेश्वरी मंदिर, बाळासाहेब ठाकरे नगरमार्गे पावसात जावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले असून, त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुराचे पाणी वाढले तर दुकानात पाणी शिरेल या चिंतेत व्यापारी असून, नागरिकांनाही सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला असून, नागरिकांची चिंता वाढली आहे.


पुराच्या पाण्यातून गाडी काढण्याचे धाडस बेतले जीवावर, 8 जण वाहून गेल्याची भीती