HomeरायगडBharat Gogawale : नवीन वर्षात पालकमंत्रीपदाची भेट मिळणार, भरत गोगावले यांचा पुन्हा...

Bharat Gogawale : नवीन वर्षात पालकमंत्रीपदाची भेट मिळणार, भरत गोगावले यांचा पुन्हा दावा

Subscribe

पनवेल : रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळेल याबाबत अजून स्पष्टता नसली तर आपणच पालकमंत्री होऊ, असा दावा रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा केला आहे. 21 डिसेंबर रोजी नागपुरात खातेवाटप केल्यानंतर दोन दिवसांत पालकमंत्रीपदाचा निर्णय होईल, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात 11 दिवस झाले तरी पालकमंत्रीपदाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पडद्यामागे पालकमंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे.

मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद मिळावे, ही भरत गोगावले यांची पाच वर्षांपासून इच्छा होती. ती त्यांनी अनेकदा जाहीर वक्तव्य करून दाखवली होती. म्हणूनच यावेळी पालकमंत्रीपदावर त्यांनी दावा केला आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार, शिवाय जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत आणि भाजपचे तीन आमदार पाठिशी असल्यामुळे नवीन वर्षात पालकमंत्रीपदाची भेट मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांनाच मिळावे, यासाठी त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे.

हेही वाचा…  Cabinet Minister : शपथविधीला 17 दिवस उलटले; पण 9 मंत्र्यांच्या पदभाराचा आता पताच नाही

महायुतीचे सरकार बहुमतात आले असले तरी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आधीपासून मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती. त्यामुळेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागला असला तरी मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमधील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 डिसेंबर रोजी झाला. गंभीर बाब म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर 21 डिसेंबरला उशिरा खातेवाटप झाले. मात्र, अजून पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे नवीन वर्ष उजाडले तरी पालकमंत्रीपदाचा निर्णय होऊ शकलेला नाही.

हेही वाचा…  Raigad Tourist : काशीद समुद्रकिनारी आणखी एका पर्यटकाचा मृत्यू, आठवड्यातील दुसरी दुर्घटना

काहीही झाले तरी शिवसेनेलाच पालकमंत्री मिळावे यासाठी भरत गोगावले आग्रही आहेत. त्यातही पालकमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, यासाठी गोगावले प्रयत्नशील आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत पालकमंत्रीपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

(Edited by Avinash Chandane)