Eco friendly bappa Competition
घर रायगड माणगाव नगर पंचायत निवडणूकीत आघाडी आणि राष्ट्रवादीचा १२-१२ जागांवर दावा

माणगाव नगर पंचायत निवडणूकीत आघाडी आणि राष्ट्रवादीचा १२-१२ जागांवर दावा

Subscribe

गेल्या निवडणुकीत शिवसेनेला अति आत्मविश्वास नडल्याने केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. आता मात्र आघाडी झाल्याने मतांची विभागणी होणार नसल्याने यावेळी माणगाव विकास आघाडी बाजी मारेल असा विश्वास शिवसेनेचे नेते अ‍ॅड.राजीव साबळे यांनी व्यक्त केला आहे.

माणगाव नगर पंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण चांगले तापले आहे. राष्ट्रवादी आणि आघाडी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. सर्वच पक्षांनी तगडे व वजनदार उमेदवार दिले आहेत. पहिल्या टप्प्यात १३ जागांवर निवडणूक लढवली गेली. तर आता ४ जागांवर निवडणूक होत आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत चारही जागांवर शिवसेनेचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवीत होती. आता मात्र शिवसेनेने माणगाव विकास आघाडी करून भाजप व काँग्रेस यांना एकत्र आणून तीन पक्षांची आघाडी बनविली आहे. हे तिन्ही पक्ष मागील वेळी स्वबळावर लढले होते. याचा फायदा राष्ट्रवादीला होऊन राष्ट्रवादीने १२ जागा अटीतटीच्या लढाईत जिंकल्या होत्या. त्यावेळी किमान ८ उमेदवार अतिशय थोड्या मताने पराभूत झाले होते. यावेळी मागील चूक सुधारून आघाडी करत राष्ट्रवादीला धक्का देऊन १२ ते १४ जागा निवडून येतील अशी चोख व्यवस्था केली आहे. तर राष्ट्रवादीने देखील विकासाची कामे आपणच केली आहेत असा दावा करून १२ जागांवर दावा ठोकला आहे. निवडणुकीतील राजकीय वारे पाहता शिवसेना आघाडीचे पारडे जड झाले आहे असे दिसून येत आहे. मात्र ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून १९ तारखेनंतरच अंतिम निकालाअंती चित्र स्पष्ट होईल.

- Advertisement -

गेल्या निवडणुकीत शिवसेनेला अति आत्मविश्वास नडल्याने केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. आता मात्र आघाडी झाल्याने मतांची विभागणी होणार नसल्याने यावेळी माणगाव विकास आघाडी बाजी मारेल असा विश्वास शिवसेनेचे नेते अ‍ॅड.राजीव साबळे यांनी व्यक्त केला आहे. माणगाव शहरातील शंभरहून अधिक इमारती उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्या होत्या. त्या इमारतींना संरक्षण देऊन त्या मुंबई, पुणे, ठाणे या शहरांच्या धर्तीवर नियमित करण्याचे आश्वासन माणगाव विकास आघाडीतर्फे देण्यात आले आहे. तसेच जुने माणगाव, खांदाड आणि नाणोरे येथे नवीन पाणी योजनांना प्राधान्य देत या पाणी योजना पाच वर्षात पूर्ण करून माणगाव शहरात शेवटच्या घरापर्यंत मुबलक व शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. त्यामुळे जनता आमच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात आघाडीला विजयी करील असा आत्मविश्वास शिवसेना, काँग्रेस, भाजप नेत्यांना आहे.

राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षात अंतर्गत रस्ते व इतर विकासकामे केली आहेत. जी विकासकामे झालेली नाहीत किंवा अपूर्ण आहेत ती विकासकामे या पाच वर्षात पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे. जी विकासकामे झाली ती राष्ट्रवादीनेच केली आहेत असा दावा खासदार सुनिल तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे यावेळीही माणगाव नगर पंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास आपल्या भाषणातून व्यक्त करीत आहेत. विकासकामांच्या जोरावरच राष्ट्रवादी ही निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. यावर शिवसेनेने पलटवार केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांच्या हलगर्जीपणामुळे केंद्र राज्य शासनाने दिलेला कोट्यवधीचा निधी परत घालविला आहे. शिवसेना मंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून शिवसेनेने कोट्यवधीचा निधी माणगांवच्या विकासाकरिता आणला होता. मात्र तो निधी राष्ट्रवादीनी रद्द केला. त्यामुळे राष्ट्रवादीने ठळक व लक्षणीय काम कोठेही केलेले दिसत नाही. अद्यापही काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट व वणवण करावी लागत आहे. रोहा नगर परिषदेमध्ये जेवढा निधी आणला तेवढा निधी माणगाव नगर पंचायतीत का आणला गेला नाही? असा सवाल शिवसेना करीत आहे. राष्ट्रवादी मतदारांना एकदा, दोनदा फसवून सत्ता हस्तगत करू शकते. मात्र यावेळी माणगावातल्या सुज्ञ मतदारांनी माणगाव विकास आघाडीलाच विजयी करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे यावेळी माणगाव विकास आघाडी विजयाचा गुलाल उधळील असा विश्वास शिवसेना नेते राजीव साबळे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

माणगाव शहरातील भष्ट्राचार, ११६ बेकायदा इमारती, अजूनही अर्धवट राहिलेले नाट्यगृह, नाना-नानी पार्क, माणगाव विकास आराखडा, काल नदीवरील बंधारा, नळपाणी योजना अशी विविध विकासकामे झाली नाहीत. तर जी झालेली आहेत ती अर्धवट झालेली आहेत असा माणगाव विकास आघाडीकडून आरोप होत आहे.नव्याने बांधण्यात आलेले रस्ते सहा महिन्यातच उखडून गेले आहेत. अंतर्गत गटारांची व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. अनधिकृतपणे केलेले भराव यामुळे माणगाव शहरात ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. मुंबई महामार्ग, मोर्बा रोड, कचेरी रोड, निजामपूर रोड येथील गटाराचे पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे काल व गोद नदी दुषित झाली आहे. हे गटाराचे पाणी अन्य मार्गाने खांदाड ग्रामस्थांच्या शेतीत दरवर्षी घुसत असल्याने मोठ्या प्रमाणात शेती नापीक झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे भात शेतीचे नुकसान होते असा आरोप काँग्रेस नेते ज्ञानदेव पोवार हे करीत आहेत.

- Advertisment -