Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर रायगड जिल्ह्यात उद्यापासून अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्यात उद्यापासून अतिवृष्टीचा इशारा

दरडग्रस्त २२ गावांमधील नागरिकांचे स्थलांतर

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे समुद्र किनार्‍यावरील 62 गावे, खाडी किनार्‍यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 20 दरडग्रस्त गावांमधील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे.

मुंबईसह उत्तर कोकणमध्ये 10 आणि 11 जून रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे भूस्खलन होण्याची भीती असते. भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 103 संभाव्य दरडग्रस्त गावे आहेत. यात 20 गावांना भूस्खलनाचा तीव्र धोका असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. या 20 गावांतील नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष निधी चौधरी यांनी दिले आहेत.

- Advertisement -

म्हसळे तालुक्यातील वावा, आमशेत, महाड तालुक्यातील लोअर तुडील, टोळ खुर्द बौद्धवाडी, मोरेवाडी, शिंगरकोंड, पातेरवाडी, आंबिवली बुद्रुक, मुठवली, सोनघर, चांढवे खुर्द, रोहण, कोथेरी जंगमवाडी, खालापूर तालुक्यातील सुभाष नगर, कर्जत तालुक्यातील मुद्रे बुद्रुक, श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडले, पोलादपूर तालुक्यातील कोंढवी मराठवाडी, कोतवाली खुर्द, रोहे तालुक्यातील तिसे आणि वाळुंजवाडी या गावांमधील नागरिकांचे पुढील दोन दिवसांत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण केले जाणार आहे. याशिवाय इतर संभाव्य दरडग्रस्त गावांतील नागरिकांना तेथील परिस्थिती पाहून गरज पडल्यास स्थलांतरित केले जाणार आहे.

पाऊस पडत असताना जर समुद्राला भरती आली तर किनार्‍यावरील गावांमधील घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा गावांतील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंत्रणेला देखील सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, पाऊस पडत असताना जनतेने घरातच सुरक्षित रहावे. घर मोडकळीस आले असल्यास सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे. आपले पशुधन आणि अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. वादळाच्या कालावधीमध्ये किमान 3 दिवस पुरतील असे सुका मेवा, खाद्यपदार्थ जवळ ठेवावेत. सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे. समुद्र किनारी आणि नदी किनारी राहणार्‍यांनी सावधगिरी बाळगावी, मदत आवश्यक असल्यास ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालयास संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी दूरध्वनी 02141-222097 किंवा 227452 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आपला जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाऊस पडत असताना कुणीही घराबाहेर पडू नये. आवश्यक सामान घरात ठेवावे. पाऊस पडत असताना कुणीही समुद्र, नदी किंवा तलावांमध्ये पोहण्यास जाऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचे कोटेकोर पालन करावे.
– निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

- Advertisement -