सिंधुदुर्ग : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मतदारांनी सकाळपासून मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला आहे. नारायण राणे यांनी बुधवारी दुपारी आपली पत्नी, दोन्ही मुले आणि सुनांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मंगळवारी (19 नोव्हेंबर) भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत विरारमध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य केले. (Commentary by Narayan Rane on the incident regarding Vinod Tawde in Virar)
आज मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी निलेश आणि नितेश हे दोघेही मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, ज्यांना मी घडवलं, ज्यांनी माझ्या घरी खाल्लं आहे, आज तेच इथे विरोधक आहेत. द्वेषापोटी त्यांचा विरोध आहे, पण राजकीय विरोध नाही. इथल्या लोकांना माहिती आहे री, आमच्याशिवाय इथे विकास कोणीही करू शकत नाही. त्यामुळे लोकांना मी हवा आहे, असे म्हणत आपल्या दोन्ही मुलांना मंत्रीपद मिळायला हवे, अशीही इच्छाही नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. तसेच माझी दोन्ही मुलं मंत्री झाले तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. ईश्वराच्या कृपेने तसं घडलं तर चांगलंच आहे, असेही नारायण राणे म्हणाले.
हेही वाचा – Ajit Pawar : पत्रकाराच्या प्रश्नावर अजितदादांनी दाखवलं मिडल फिंगर अन् करंगुळी; म्हणाले, “अरे वेड्यांनो…”
विनोद तावडे यांच्याबद्दल विचारले असता नारायण म्हणाले की, विनोद तावडे यांच्याविषयी जे घडले ते योग्य नव्हते. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या एका पक्षाच्या नेत्याला अशाप्रकारे वागणूक देणे मला पसंत नाही. त्यामुळे विनोद तावडे यांना मिळालेली वागणूक आपल्याला आवडली नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला. याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंमुळे मी शिवसेना सोडली. त्यांचे विचार चांगले नाहीत. त्यांना 10 ते 12 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही. पण महायुतीचे 161 आमदार निवडून येतील. भाजपा, राष्ट्रवादी काँगेस आणि शिवसेनेची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.