घररायगडअवजड वाहतुकीने महामार्गाच्या दर्जाचे पितळ उघडे

अवजड वाहतुकीने महामार्गाच्या दर्जाचे पितळ उघडे

Subscribe

दोन महिने चाललेल्या अवजड वाहतुकीने खालापूर ते खोपोली दरम्यान मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे पितळ उघडे पाडले असून, खचलेला रस्ता पावसाळ्यापूर्वी ठेकेदार दुरुस्त करेल का, असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.

या महामार्गावर खालापूर ते खोपोली फाटा या 7 किलोमीटर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. ईगल इन्फ्रा कंपनीला कामाचा ठेका मिळाला होता. परंतु अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दोन वर्षे पावसात सतत रस्ता धुवून गेला होता. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे खालापूर ते खोपोली प्रवास पावसाळ्यात नकोसा झाला होता .खराब रस्त्याने दोन बळी घेतले आणि आंदोलन झाल्यानंतर ठेकेदार काही प्रमाणात वठणीवर येऊन रस्त्याचे काम पूर्ण केले होते. अद्यापही खोपोली हद्दीत काही ठिकाणी काम सुरू आहे. मध्यंतरी येथून जाणार्‍या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने सर्व अवजड वाहतूक खालापूर फाटा ते खोपोली फाटा मार्गे वळविण्यात आली होती.

- Advertisement -

या वाहतुकीमुळे पुन्हा एकदा खालापूर ते खोपोली रस्त्याची पोलखोल झाली असून, खालापूर हद्दीत अनेक ठिकाणी नव्याने केलेला रस्ता खचला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी अशा प्रकारे रस्ता खचला असून, पावसाळ्यामध्ये खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी खड्डे तयार होणार आहेत. परिणामी वाहतुकीस हा रस्ता पूर्णपणे धोकादायक ठरणार आहे. रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती 2022 पर्यंत ईगल इन्फ्राकडे असून, खचलेला रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी या ठेकेदाराची आहे. परंतु पावसाळा तोंडावर आला तरी अद्यापही ठेकेदार फिरकला नसून रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेल्यानंतर तो येणार का, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत

सप्टेंबर 2018 मध्ये एका महिलेचा बळी खराब रस्त्यामुळे गेला होता. त्यानंतर कंत्राटदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी मोठ्या संख्येने जमाव जमला होता. पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी परिस्थिती कौशल्याने हाताळत नियंत्रणात आणली होती. त्यानंतर हाळ गावाजवळ वळणावर दुचाकीचा अपघात होऊन पती-पत्नीसह एक वर्षांचा मुलगा ठार झाला होता. त्यामुळे ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका सहन केलेले प्रवासी खचलेला रस्ता पाहून भयभीत झाले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे खचलेला रस्त्याबाबत विचारणा केली असता, हा रस्ता 2022 पर्यंत ईगल इन्फ्रा कंपनीकडे असून, त्यानंतर तो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सध्यातरी ईगल इन्फ्राने रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

ज्या प्रकारे रस्ता खचलायं ते पाहता दुचाकी अपघाताची दाट शक्यता असून, एखादा जीवघेणा अपघात होण्यापूर्वी ठेकेदाराने रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा त्या अपघाताला ठेकेदार जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू.
-किरण हाडप, सामाजिक कार्यकर्ता, नावंढे-खालापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -