घररायगडदरडग्रस्त गावे होणार सुरक्षित; उपायांसाठी आधुनिक यंत्रणांचा होणार वापर

दरडग्रस्त गावे होणार सुरक्षित; उपायांसाठी आधुनिक यंत्रणांचा होणार वापर

Subscribe

मान्सूनमध्ये काही भागात दरडीसारख्या ओढावणार्‍या नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी केली आहे. पूर, चक्रीवादळे, दरडी कोसळणे यावर मात करण्यासाठी आधुनिक यंत्रणा वापरली जाणार असून या उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात दरडप्रवण गावांमध्ये दरवर्षी वाढ होत असून मागील १५ वर्षात १०३ वरुन ही संख्या २११ वर गेली असल्याने येथे विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

रत्नाकर पाटील : अलिबाग
मान्सूनमध्ये काही भागात दरडीसारख्या ओढावणार्‍या नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी केली आहे. पूर, चक्रीवादळे, दरडी कोसळणे यावर मात करण्यासाठी आधुनिक यंत्रणा वापरली जाणार असून या उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात दरडप्रवण गावांमध्ये दरवर्षी वाढ होत असून मागील १५ वर्षात १०३ वरुन ही संख्या २११ वर गेली असल्याने येथे विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
मान्सून सुरु होण्यास अद्याप दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असताना दरडप्रवण गावातील उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्तींचा मान्सूनपूर्व आढावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सर्व अधिकार्‍यांसह स्वयंसेवी संस्थांचे सदस्य उपस्थित होते. यात विषेशतः दरडी कोसळू नये यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात दरडीमध्ये मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या अन्य नैसर्गिक आपत्तींपेक्षा सर्वाधिक आहे. यासह दरडी कोसळून रहदारी विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. दरडी कोसळण्यानंतर मदतकार्य राबवण्यापेक्षा आपत्ती येण्यापूर्वी उपाययोजना केल्यास होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. यासाठी जिल्हा प्रशासन यावर गांभिर्याने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे म्हणणे आहे. दरडग्रस्त गावातील नागरिकांचे निरिक्षण त्यावर तज्ज्ञांनी मांडलेली मते यांचा सखोल अभ्यास करुन यावर उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाचे सुक्ष्म निरिक्षण करता यावेत यासाठी प्रत्येक महसूल मंडळस्तरावर कृषी विभागाकडून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वीत करण्याच्या सूचना (जीएसआय) भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केल्या आहेत. जिल्ह्यात असे ८२ महसूल मंडळ असून यातील फक्त ५ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र सुरु झाली आहेत, उर्वरीत १७ ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नाविन्यपूर्ण योजनांमधून महाड तालुक्यात सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात एकूण २६ ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात येत आहे. यासाठी १३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
बॉक्स…
धरणांमुळे पुराचा धोका असलेली गावे (कंसात तालुक्याचे ठिकाण)
भोईघर, मांडला, बोर्ली (मुरुड); वावा, राणेची वाडी, खैराट, बामणघर, अंबेशी (तळे); आंबेघर (पेण), श्रीगाव (अलिबाग); नवघर, कोंडगाव, पेडली, घोटवडे, परली, केवळे, उद्धर, उन्हेरे (सुधागड); बोर्ली पंचतन, गोंडघर, वडवली, कुडकी (श्रीवर्धन-); बौध्दवाडी, विठ्ठलवाडी, पाभरेगाव, संदेरी, फळसप (म्हसळे); वरंध, बारसघर, शिरवली, पांगारी, वरंडोली, नांदगाव, वलंग, जुई, सोनघर, खैरे (महाड); सावणे, जांभिवली, देवलोली (पनवेल).

दरडींमुळे वाहतूक विस्कळीत होणारी ठिकाणे
आंबेनळी घाट आणि कशेडी घाट, पोलादपूर; कार्लेखिंड, अलिबाग; ताम्हाणी घाट, माणगाव; अंडा पाँईट,खालापूर; सुकेळी खिंड आणि भिसे खिंड, रोहे.

- Advertisement -

दरडी रोखण्यासाठी शिफारशी
दरडप्रवण भागात पर्जन्यमापक यंत्र बसविणे, ज्यामुळे अतिवृष्टीचा अंदाज घेवून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे शक्य होईल; दरडग्रस्त गावांमध्ये होणार्‍या बांधकांमाबाबत जनजागृती करणे; विविध जैविक वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देणे; तीव्र उतारावरील गावांमध्ये संरक्षण भिंत बांधणे

अतिवृष्टीमध्ये जमीन नरम होत असल्याने तीव्र उतारावरील माती न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली घसरते. सह्याद्रीच्या पट्ट्यात दरडींचे प्रमाण वाढलेले आहे, त्यास आपणच जबाबदार आहोत. झालेली वृक्षतोड, माती उत्खनन आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता डोंगर उतारावर बांधलेली घरे यास कारणीभूत आहेत. अशा परिस्थितही दरडींपासून होणारे नुकसान कमी करणे शक्य आहे. दरडी कोसळण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. या संकेतांची कल्पना तेथील नागरिकांना सर्वप्रथम येते. यासाठी दरडप्रवण गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे होणारी जीवित, वित्त हानी कमी करता येणे शक्य आहे.
– प्रा. डॉ. सतिष ठिगळे,
निवृत्त विभागप्रमुख, भूशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -