Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर रायगड कर्जतमध्ये पुन्हा एकदा श्रेयवाद

कर्जतमध्ये पुन्हा एकदा श्रेयवाद

आयत्या रस्त्यावर सत्ताधार्‍यांच्या रेघोट्या!

Related Story

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत मंजुरी मिळालेल्या श्रद्धा हॉटेल भिसेगाव ते चारफाटा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन विद्यमान सत्ताधारी शिवसेना करीत असून, यानिमित्त होणार्‍या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना डावलण्यात आले आहे. सत्ताधार्‍यांचे हे भूमिपूजन म्हणजे ‘आयत्या पिठावरच्या रेघोट्या’ या उक्तीप्रमाणे ‘आयत्या रस्त्यावर सत्ताधार्‍यांच्या रेघोट्या’ असल्याचे बोचरी टीका राष्ट्रवादीकडून केली जात आहे .

या रस्त्याला दोन वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाल्याने त्याचे काम होणे अपेक्षित होते. मात्र रस्त्याचे काम कोण करणार, या वादात काम रखडले ते मागील आठवड्यापर्यंत! राष्ट्रवादीने याबाबत दोन दिवसांपूर्वी आवाज उठवत उपोषणाचे हत्यार उपसले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी यात उडी घेत उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेपुढे पेच निर्माण होऊन या कामाची तातडीने वर्कऑर्डर काढत काम सुरू करण्यास ठेकेदारास सांगण्यात आले. खर्‍या अर्थाने या कामाचे श्रेय पूर्णपणे राष्ट्रवादीलाच जाते. तरी सत्ताधारी शिवसेनेने शनिवारी होणार्‍या या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमापासून राष्ट्रवादीला दूर ठेवल्याने पुन्हा एकदा श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेने दावा केला की, रस्त्याचे काम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नामुळे मार्गी लागले आहे . शिवसेनेकडून तशा आशयाचे बॅनरही समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. या कामाचे भूमिपूजन सकाळी 11 वाजता आमदार महेंद्र थोरवे आणि नगराध्यक्षा सुर्वणा जोशी यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांना यामध्ये स्थान दिले नसल्याने गेल्या आठवड्यातील प्रशासकीय भवनाच्या भूमिपूजन मानापमान नाट्यानंतर पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -