खोपोली : अज्ञात कारणावरून पतीने ओढणीने पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. ही घटना खोपोली शहरातील लौजी परिसरात घडली आहे. शीतल गणेश घोडके (28) असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी गणेश दादासाहेब घोडके (32) पळून गेला होता. मात्र, खोपोली पोलिसांनी पाठलाग करत सातारा आणेवाडी टोलनाक्यावर त्याला अटक केली. हे दाम्पत्य सुखकर्ता अपार्टमेटमध्ये 5 महिन्यांपासून राहत होते.
पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह अंथरुण-पांघरुणांमध्ये गुंडाळून त्यावर कपड्यांचा ढिग टाकून तो बाथरूममध्ये बंद करून गणेश पळाला होता. ही माहिती त्याने मित्र आशुतोष दिलीप देशमुख याला दिली. त्यांतर मित्र तातडीने खोपोलीच्या घरात बुधवारी (8 जानेवारी) पहाटे 3 वाजता पोहोचला तेव्हा बाथरूममध्ये मृतदेह दिसला. त्याने गणेश घोडके याला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये घेवून जातो, असे सांगितले. त्यानंतर गणेशने भीतीने फोन फोन बंद केला आणि कारमधून पळून गेला.
त्यानंतर आशुतोषच्या (डोंगरगण, अहिल्यानगर) तक्रारीनुसार खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी घटनास्थळाची पाहणी करत चौकशी केली त्यानंतर गणेश घोडके याच्या गाडी नंबरवरून तपासाचे चक्र फिरवले असता उर्से टोल नाक्यावरून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खोपोली पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग केला. गणेश साताऱ्याकडे जात असताना खेड शिवापूर टोलनाक्यावर चकवा दिला. त्यानंतर पोलिसांनी गणेशला सातारा आणेवाडी टोलनाक्यावर अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे करत आहेत.
एक्स्प्रेस-वेवर अपघात, चालक जागीच ठार
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर बुधवारी (8 जानेवारी) पहाटे एका ट्रेलरचालकाला रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ट्रेलरचालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलरचालक बिकास के. आर. यादव (38, कांतापूर, पश्चिम बंगाल) एक्स्प्रेस-वेवरुन ट्रेलर मुंबईकडे आणत होता. बोरघाटात ढेकू गावाजवळ ट्रेलरचा पुढचा टायर फुटल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. मात्र, काही कामासाठी एक्स्प्रेस-वे ओलांडत असताना मधल्या लेनवर असताना भरधाव वेगात येणाऱ्या एका वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या शरीराच्या चिंधड्या होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआयबी यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह रस्त्याच्या बाजूला केला.
(Edited by Avinash Chandane)