घररायगडआदिवासी वाड्यांकडे जाणाऱ्या साकवाची दुरावस्था

आदिवासी वाड्यांकडे जाणाऱ्या साकवाची दुरावस्था

Subscribe

साकव बांधण्यात आल्याने आदिवासी नेरळ किंवा माथेरान येथे रोजगार मिळविण्यासाठी जाऊ शकतात.

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर भागात १२ आदिवासी वाड्या आहेत. तेथे पावसाळ्यात लहान-मोठे ओढे ओलांडत जावे लागते. त्यात १० वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेने बांधलेला बेकरेवाडी येथील साकव मुसळधार पावसात नादुरुस्त झाला आहे. तो वाहून गेल्यास आदिवासींना बाहेर पडणे कठीण होणार आहे. जुम्मापट्टी धनगरवाडापासून कर्जत-किरवलीपर्यंत १२ आदिवासी वाड्या आहेत. तेथे जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही. वन जमीन असल्याने रस्ते होत नाहीत. त्याचवेळी त्या भागात माथेरानच्या डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो. त्यामुळे पूर्वी या भागातील आदिवासींना पावसाळ्यात आपल्या घरातून बाहेर पडता येत नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांत चार ठिकाणी साकव बांधण्यात आल्याने आदिवासी नेरळ किंवा माथेरान येथे रोजगार मिळविण्यासाठी जाऊ शकतात. त्यातील पहिला साकव १० वर्षांपूर्वी जयश्री कराळे रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना बांधण्यात आला. तर दोन लहान साकव हे २०२० मध्ये बांधले गेले आहेत.

या भागात पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात दगड देखील वाहून येत असतात. त्यामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत असतात. परिणामी साकव दरवर्षी कमजोर होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याची गरज असते. मात्र याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या माणगाव ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती बेताची असल्याने दुरुस्ती होत नाही. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बेकरेवाडी येथील जुना साकव नादुरुस्त झाला आहे. या साकवाचा पाया कमजोर झाला असून, वाहून जाण्याच्या स्थितीत उभा आहे. त्यामुळे याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

स्थानिक आदिवासी कार्यकर्ते गणेश पारधी यांनी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य नारायण डामसे यांना दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. तर आदिवासी कार्यकर्ते जैतु पारधी यांनी रायगड जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळावा यासाठी माजी आमदार सुरेश लाड यांना पत्र दिले आहे. साकवाची दुरवस्था झाल्याची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांना पाहणी करण्यास सांगितले असून, अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर पुलाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील,असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य नारायण डामसे यांनी केले आहे.


हेही वाचा – राज कुंद्रावर कारवाई एकाच केसपुरती मर्यादित नाही, पॉर्न प्रकरणावर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -