घररायगडतिसर्‍या मुंबईतील १२४ गावांच्या हरकती-सूचनांना मुदत वाढ द्या

तिसर्‍या मुंबईतील १२४ गावांच्या हरकती-सूचनांना मुदत वाढ द्या

Subscribe

अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेची मागणी

वडखळ-: मुंबई नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे. अटल सेतू आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी पनवेल आणि उरण परिसरात तिसर्‍या मुंबईची योजना आखली आहे. अटल सेतूजवळ तब्बल १२४ गावांची तिसरी मुंबई विकसित केली जाणार आहे. तिसर्‍या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे. पेण आणि उरण तालुक्यातील १२४ गावांच्या विकासाचे सर्वाधिकार एमएमआरडीएला देण्यात आल्यानंतर अध्यादेशावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. मात्र हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी (Demand for extension of 30 days for filing objections and suggestions on the ordinance after all development powers of 124 villages in Pen and Uran talukas were given to MMRDA) अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेने राज्य शासनाकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी दिली.

शासनाने अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील उरण, पेण, पनवेल तालुक्यातील १२४ गावांची ‘नवेनगर‘ (तिसरी मुंबई) उभी करण्यासाठी एमएमआरडीएला नवेनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा विकास होणार की गावे उध्दवस्त होणार, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

रायगड प्रादेशिक योजनेचा अध्यादेश हा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध करण्यात आला. मात्र यादरम्यान प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधीं सगळेच निवडणुकीच्या कामात व्यस्त झाल्याने नागरिकांमध्ये अपेक्षित जनजागृती होऊ शकली नाही. त्यांच्यापर्यंत पुरेशी माहिती पोहचू शकली नाही. परिणामी सर्व सामान्य माणूस हरकती आणि सूचना नोंदविण्याच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ राहिला आहे. त्यामुळे आपली बाजू मांडण्याचे जनतेचे अधिकार अबाधित रहावे म्हणून शासनाने अजून एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती संस्थेने राज्याचे मुख्य सचिव व नगरविकास विभागाच्या सचिवांकडे केली आहे.

इतका मोठा निर्णय घेतांना शासनकर्त्यांनी बाधित लोकांशी संवाद साधला नाही की, त्यांना विस्वासात घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. स्थानिक जनतेला गृहीत धरूनच त्यांनी हा निर्णय थोपविला आहे.जर शासनाने तसे न करता आपला प्रकल्प जबरदस्तीने रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर शासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशाराही सूर्यकांत पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

मुंबई, नवी मुंबई पर्यंतच्या शेतजमिनी, मीठागरे आधीच उध्वस्त केली आहेत. आता उरलेल्या ठाणे, रायगडवर वक्रदृष्टी फिरल्याने मूळनिवासी आगरी, कोळी बांधवांना आपल्या मायभूमीतूनच बेदखल होण्याची भीती सतावू लागली आहे. याकरिता जनतेने संघर्षासाठी सज्ज झाले पाहिजे. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -