Diveagar : दिवेआगरचा सुवर्ण गणेश अखेर ९ वर्षांनी विराजमान ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुनःप्रतिष्ठापना

गणेशाच्या प्रतिष्ठापनेमुळे या परिसराला आणि दिवेआगरला पर्यटनाचे महत्व पुन्हा अबाधित राहील

Diveagar's golden Ganesha finally reigns after 9 years; Re-installation by Ajit Pawar
Diveagar : दिवेआगरचा सुवर्ण गणेश अखेर ९ वर्षांनी विराजमान ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुनःप्रतिष्ठापना

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना अखेर ९ वर्षांनंतर करण्यात आली आहे.अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नव्याने घडविण्यात आलेल्या सुवर्ण गणेशाच्या मुखवट्याची मंदिरात पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सने सुवर्ण गणेशाचा हा नवा मुखवटा तयार केला असून, तब्बल नऊ वर्षांनी दिवेआगारातील मंदिरात सुवर्ण गणेशाची पुनर्स्थापना होत असल्याने गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.गणेशाच्या प्रतिष्ठापनेमुळे या परिसराला आणि दिवेआगरला पर्यटनाचे महत्व पुन्हा अबाधित राहील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

दिवेआगारातील मंदिरात सुवर्ण गणेशाची पुनर्स्थापनेबाबत पालकमंत्र्यांच्या विनंतीनुसार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संप्टेंबरमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरोड्यात प्राप्त मुद्देमाल राज्यशासनाची मालमत्ता झाली. या मुद्देमालापासून सुवर्ण गणेश मुखवटा घडविणे आणि सुवर्ण गणेश मंदिरात प्रतिष्ठापना करुन त्याचा ताबा मंदिर ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री तटकरे यांनी दिली होती.लोकभावना लक्षात घेऊन सुवर्ण गणेश प्रतिष्ठापना करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन व दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांनी समन्वयाने करावी, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बैठकीत संबंधितांना दिले होते.

काय आहे प्रकरण ?

दिवेआगरातील मंदिरात अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून सुवर्ण गणेशाची पुनर्स्थापना करण्यात आली. २३ मार्च २०१२ रोजी दरोडेखोरांनी दिवेआगर मंदिरातील सुरक्षा रक्षकांचा खून करून मंदिरातील सुवर्ण गणेशाचा मुखवटा आणि दागिने पळवून नेले होते. दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरामध्ये २४ मार्च २०१२ रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी, महादेव गोपाळ घडशी आणि अनंता बापू भगत या दोन सुरक्षारक्षकांची हत्या करुन मंदिरातील सुवर्णमूर्ती आणि सोने लुटून नेले होते.या घटनेनंतर राज्यभर एकच खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलिसांना दरोडेखोरांचा कसून शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १ किलो ३६१ ग्रॅम सोने हस्तगत केले होते.


हे ही वाचा – दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर: सोन्याच्या मुखवट्याचा तिढा सुटला, काय आहे प्रकरण? मंदिराचा इतिहास काय?


कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली…

अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरु होती.विशेष मोक्का न्यायाधीश के.आर. पेठकर यांच्या न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत एकूण १०४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात मंदिर व्यवस्थापन समिती, तपासिक अधिकारी, पंच साक्षीदार, वाहनचालक, वैद्यकीय अधिकारी, सीसीटीव्ही तंत्रज्ञ यांच्या आणि स्थानिकांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.याप्रकरणी ५ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. २ सोनारांना ९ वर्षे आणि ३ महिलांना १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.