घररायगडकष्टाने उभा केलेला संसार पुरात उद्ध्वस्त

कष्टाने उभा केलेला संसार पुरात उद्ध्वस्त

Subscribe

शहरात आलेल्या महाप्रलयाने क्षणात निम्म्याहून अधिक संसार उघड्यावर आले असून, काबाडकष्ट करून उभा केलेला संसार क्षणात नष्ट झाल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यातून आलेला पूर आता थांबायचे नाव घेत नाही.

गेले तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी कधी नव्हे इतके रौद्र रूप धारण केले होते. असे शहरात आलेले पाणी उभ्या हयातीत पाहिले नसल्याची प्रतिक्रिया अनेक बुजुर्गांनी व्यक्त केली. पाण्याची पातळी जवळपास २० फुटांपर्यंत पोहोचली आणि सुरक्षित समजल्या जाणार्‍या इमारतीचाही पार्किंग परिसर सोडून पहिल्या मजल्यावर पुराचे पाणी गेल्याने हजारो संसार डोळ्यासमोर उघड्यावर आले. घरातील अन्नधान्य, कपडे, फर्निचर पुराच्या पाण्यातून आलेल्या चिखलाने नष्ट झाले. बैठ्या घरांतून तर होत्याचे नव्हते झाले आहे.

- Advertisement -

शनिवारी दिवसभर शहरातील दुकानदार आपापल्या दुकानांतील, तर रहिवासी घरातील भिजलेले सामान रस्त्यावर आणून टाकत आहेत. स्वाभाविक एक प्रकारची दुर्गंधी निर्माण होत आहे. यामुळे आता रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाची अवस्थाही भांबावल्यासारखी झाली असून, रस्त्यावर आणून टाकण्यात आलेली घरे, दुकानांतील साहित्य हटविण्यासाठी जेसीबी न आल्याने काहींनी नाराजी बोलून दाखविली. खबरदारीचा उपाय म्हणून काही नागरिकांनी पुढाकार घेत भिजलेले साहित्य दूर अंतरावर टाकण्यास सुरुवात केली.

या पुरामुळे शहराप्रमाणेच दादली, राजेवाडी, लाडवली, आसनपोई, आकले, खाडी पट्ट्यातील गावांमध्ये देखील थैमान घातल्याने तेथे घरांचे नुकसान झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस तरी वीज पुरवठा सुरळीत होणार नसल्याने घरात मेणबत्ती, अन्नधान्य, कपडे आणि बिछाना अशा मदतीची नितांत गरज आहे. शहरात शनिवारी म्हसळे, बोर्ली, श्रीवर्धन येथील मुस्लीम संघटनांनी अशा प्रकारच्या मदतीचे वाटप सुरू केले. या मदतीच्या वाहनांसमोर पूरग्रस्त गर्दी करत होते.

- Advertisement -

महाप्रलयाने घरातील सर्वच सामान भिजून गेले. अशातच आता विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाकरिता लागणारी पुस्तके देखील भिजून गेली आहेत. शिवाय शैक्षणिक, कौटुंबिक आणि शासकीय कागदपत्रे देखील या पुरात वाहून गेल्याने पालक आणि विद्यार्थ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, पुरामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे किमान ५ ते ६ अग्निशमन दलाची वाहने बोलावून त्यांच्या सहाय्याने तातडीने साफसफाईची मोहीम हाती घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -