Maharashtra Assembly Election 2024
घररायगडFake Letter : शेकापचा भाजपला पाठिंबा, जयंत पाटलांच्या बनावट सही, शिक्क्याचे पत्र...

Fake Letter : शेकापचा भाजपला पाठिंबा, जयंत पाटलांच्या बनावट सही, शिक्क्याचे पत्र व्हायरल करून खळबळ, संशयाची सुई भाजपकडे

Subscribe

पनवेल : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी पेण आणि उरण मतदारसंघात भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या पत्रामुळे महाविकास आघाडी आणि खासकरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, हे बनावट पत्र असून याविरोधात शेकापने मुख्य निवडणूक अधिकारी तसेच अलिबाग सायबर आणि उरण पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच हे कृत्य भाजपचे उमेदवार महेश बालदी आणि रवींद्र पाटील यांनी केल्याचा संशय त्यांनी तक्रारीतून व्यक्त केला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या बनावट सहीचे पत्र व्हायरल करून कुणाला फायदा करून घ्यायचा होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा…  Maharashtra Assembly 2024 : अखेर विनोद तावडेंविरोधात गुन्हा दाखल; 9 लाखांची रोकड जप्त

- Advertisement -

मतदानाला अवघे काही तास उरलेले असताना मंगळवारी रात्री रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या सहीचे पत्रक व्हायरल करून त्यात उरणमध्ये भाजपचे महेश बाल्दी आणि पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याचे या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. एवढेच नाही तर भाजपच्या या दोन्ही उमेदवारांकडे उरण आणि पेणच्या विकासाचे धोरण आहे. त्यामुळे जर हे उमेदवार जिंकून आले तर उरण आणि पेणचा सर्वांगीण विकास होईल, असे नमूद केल्यामुळे रायगडमध्ये खळबळ उडाली होती.

हेही वाचा…  Cash for Vote : तावडे प्रकरणावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला; कोणी टेम्पोने पाच कोटी पाठवले?

- Advertisement -

समाजमाध्यमांवर हे पत्र व्हायरल होताच रायगडमधील राजकारण ढवळून निघाले. पेण आणि उरणमधील शेकापच्या उमेदवारांची धावपळ उडाली. त्यानंतर समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले पत्र बनावट असल्याचे शेकापकडून स्पष्ट करण्यात आले. एवढेच नाही तर शेकापचे बनावट लेडरहेड वापरून आणि सरचिटणीस जयंत पाटील यांची खोटी सही आणि शिक्का वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेकापचे कार्यालयीन सचिव अॅड. राजेश कोरडे यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शेकापने केली आहे. पेणमधून शेकापचे अतुल म्हात्रे आणि उरणमधून प्रीतम म्हात्रे निवडणूक लढवत आहेत आणि अचानक पाठिंब्याचे बनावट पत्र व्हायरल करून या दोन्ही उमेदवारांना निवडणुकीतून बाद करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -