घररायगडफणसाड अभयारण्यातील बिबट्याची साळावमध्ये दहशत

फणसाड अभयारण्यातील बिबट्याची साळावमध्ये दहशत

Subscribe

बिबट्याने आतापर्यंत गेले दोन-तीन दिवसांत कुत्रे, बकरी व वासरू फस्त केले आहेत. तसेच पहाटेच्या सुमारास मुख्य रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे मनुष्यहानीची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

 

अलिबाग;अमूलकुमार जैन
फणसाड अभयारण्यातील बिबट्याचा वावर गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून जंगलभाग सोडून मनुष्यवस्तीत होत असल्याने साळाव पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याने आतापर्यंत गेले दोन-तीन दिवसांत कुत्रे, बकरी व वासरू फस्त केले आहेत. तसेच पहाटेच्या सुमारास मुख्य रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे मनुष्यहानीची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
साळावचे रहिवासी कृृष्णा पाटील यांच्या म्हशीचे वासरू दि. 28 नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने रस्सी तोडून जंगलात पळवून नेले, तसेच पठारावरील आदिवासी बांधवाची बकरी गोठ्यातून बिबट्याने पळवून नेली. त्यानंतर दि. 30 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने जोरदार हल्ला चढवीत म्हशीच्या दोन वासरांचा प्राण घेतला.
याबाबतची माहिती समजताच रोहा येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक व मुरुड वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्ली वनपाल वैभव शिंदे, वनरक्षक पंढरिनाथ दिघे, भगवान पिंगळे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सदर घटनेचा रितसर पंचनामा करण्यात आला आहे.पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टरांनी म्हशीच्या दोन वासरांचे शवविच्छेदन केले असून, पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.
याबाबत साळाव ग्रामपंचायतीचे वतीने सरपंच निलम सागर पाटील यांनी वनक्षेत्रपाल मुरूड यांना तातडीने निवेदनपत्र दिले असून, अतितातडीने निर्णय घ्यावे व कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत वनविभाग आयुक्त कोकण भवन, जिल्हाधिकारी रायगड, रायगड पोलीस अधीक्षक, विभागीय वनअधिकारी, तहसीलदार मुरूड व पोलीस निरीक्षक रेवदंडा यांना देण्यात आली आहे.
बिबट्याचा वावर धोकादायक
फणसाड जंगलातील बिबटे राजरोसपणे साळाव पंचक्रोशीत फिरत आहेत, याबाबत वनअधिकारी यांना संपर्क केले असता, ते टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. परिसरातील बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साळाव जेएसडब्ल्यू कंपनीतील कर्मचारी नित्याने येथून रात्री ये-जा करतात व शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी पहाटेच्या सुमारास बस स्टँड व मुख्य रस्त्यावर येतात, त्यामुळे बिबट्याचा वावर धोकादायक ठरला असून, मनुष्यहानीची शक्यता नाकारता येत नाही.
साळाव येथे म्हशीच्या दोन वासरांचा जंगली हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्य झालेला आहे. प्रथमदर्शनी मृत जनावराची पाहणी केली असता मानेवर व पायाकडील भागावर जखमा आढळून आल्या.
– डॉ. सुदर्शन पाडावे,
पशुधन विकास अधिकारी (मुरुड)
माझ्या गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या दोन वासरांचा मृत्यू झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा रितसर पंचनामा करण्यात येऊन मला योग्य ती नुकसान भरपाई मिळावी.
– कृष्णा रामा पाटील,
ग्रामस्थ, साळाव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -