घररायगडमच्छिमार नौका १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी सज्ज

मच्छिमार नौका १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी सज्ज

Subscribe

बोटी कसारा आणि ससून डॉक बंदरात डिझेल भरून रवाना होणार असल्याची माहिती

दोन महिन्यांपासून समुद्रापासून दूर असलेल्या दर्याचा राजाच्या म्हणजेच कोळी बांधवांची समुद्रात जाण्याच्या प्रतिक्षा आता संपली आहे. १ ऑगस्ट पासून मच्छिमारांच्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी झेपावणार आहेत. खलाशी आणि मच्छिमार यासाठी तयारीला लागले असून बोटींची रंगरंगोटी, तेल आणि इतर तयारी करण्यात सध्या मच्छिमार व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात मत्स्य खवय्यांसाठी मोठ्या प्रमाणात ताजी आणि स्वस्त मासे उपलब्ध होणार आहे. जून-जूलै हा महिना मास्यांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा काळ असतो. या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे १ जून ते १ ऑगस्ट या दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. मच्छिमार बांधव देखील या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरूस्ती,रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात. या बंदीच्या दोन महिन्यांत त्यांनी ही आपली कामे पुर्ण केली आहेत. आता मोठ्या आनंदात, गाणी गात आपल्या होड्या घेऊन साता समुद्रापलिकडे मच्छिमारी करता जाणार आहेत. प्रशासनाकडून १ जून ते ३१ जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आला होता. हा बंदीचा कालावधी संपत आला असून १ ऑगस्टपासून या मच्छिमारी नौका पुन्हा एकदा खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी जाणार आहेत.

किनाऱ्यावर मच्छिमार व खलाशांची लगबग सरू

करंजा, मोरा, दिघोडा किनाऱ्यावर दोन महिने शाकारून ठेवलेल्या नौका आता खलाशांनी गजबजून गेल्या आहेत. १०-१२ दिवस पुरेल एवढा अन्नसाठा सोबत घेवून मच्छिमार समुद्रात कुच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या बोटी सुरूवातीला ससून डॉक, भाउचा धक्का येथे जावून बोटींमध्ये डिझेल आणि बर्फ भरतील नंतर १ ऑगस्ट पासून ते मच्छिमारीला सुरूवात करतील. पहिल्या वेळेला लवकर म्हणजे ५-६ दिवसांनी ते मच्छि घेवून किनाऱ्यावर येतील त्यानंतर १०-१२ दिवसांनी त्यांची फेरी होईल असे बोटीवर जाणाऱ्या खलाशांनी सांगितले. करंजा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कोळी १ ऑगस्टपासून मच्छिमार बोटी समुद्रात मासेमारी करण्यासाठी निघणार आहेत. करंजा आणि मोरा बंदरातून शेकडो बोटी यावेळी समुद्रात जाणार आहेत. ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंद असल्यामुळे शासनातर्फे १ ऑगस्टला मच्छिमार बोटींसाठी डिझेल साठा वितरित केला जाणार आहे. या बोटी कसारा आणि ससून डॉक बंदरात डिझेल भरून रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

परराज्यातील मासेमारांचे अतिक्रमण

जीवावर उदार होऊन मासेमारी करून आपली उपजिवीका करणाऱ्या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. 15 लाखांच्या वर कुटूंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या मासेमारी व्यवसायातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. एकट्या महाराष्ट्रात जवळ जवळ ४ लाख ६८ हजार मेट्रीक टन मासळी पकडली जाते. उरण तालुक्यात देखील मच्छिमारांची संख्या लक्षणीय आहेत. करंजा, मोरा, दिघोडे, हनुमान कोळीवाडा, आवरे या गावातील अनेक लोक खोल समुद्रात जाऊन मच्छिमारी करतात. देशाच्या विकासाला महत्वाचा हातभार लावणाऱ्या या दर्याच्या राजा हा नेहमी उपेक्षीतांचे जीणे जगत असतो. शासनाने या कोळी बांधवांसाठी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यास खूप वेळ जातो. मच्छिमारांना शासनाने देऊ केलेला डीझेलचा परतावा प्रत्यक्षात वर्षानुवर्षे मिळत नाही. त्यातच परदेशातील आणि परराज्यातील मासेमारांचे अतिक्रमण हा आता महाराष्ट्राच्या मच्छिमारांसाठी मोठी समस्या झाली आहे.


हेही वाचा – शोध, आक्रोश आणि दिलासा…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -