अलिबाग : खरीप हंगामातील भातखरेदी लवकरच राज्य सरकारकडून सुरू होईल; परंतु शेतकऱ्यांमध्ये भाताची विक्री करण्यात फारसा उत्साह दिसत नाही. यंदा सर्वसाधारण 117 रुपये हमीभाव वाढवण्यात आला आहे. गेल्यावर्षी भाताला २ हजार 183 रुपये भाव देण्यात आला होता. यंदा 2 हजार 300 भाव देण्यात आला आहे.
जिल्ह्यात 28 भात खरेदी-विक्री केंद्रांना मार्केटिंग फेडरेशनकडून परवानग्या मागवण्यात आल्या आहेत. यात आणखी आठ केंद्रांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात भातखरेदी अद्याप सुरू झालेली नाही. पिकामध्ये पाण्याची आद्रता कायम असल्याने काही दिवस पीक उन्हामध्ये सुकवावे लागणार आहे. याच दरम्यान या 28 दिवसांत भात खरेदी-विक्री केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.
हेही वाचा… Nashik Crime News : गुप्तधनासाठी नव्हे तर जमिनीच्या वादातून दुहेरी खून
गेल्या वर्षी असमाधानकारक पाऊस असतानाही जिल्ह्यात खरीपासाठी 6 लाख 51 हजार क्विंटल भात पिकाची विक्री शेतकऱ्यांनी केली होती. यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भाताचा उतारा चांगला होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील 15 दिवसांत टप्प्याटप्प्याने रायगड जिल्ह्यात 28 भात खरेदी केंद्र करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्वसाधारण भात 2 हजार 300 रुपयांना विकता येणार आहे.
‘अ ‘दर्जासाठी वाढीव 20 रुपये
किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत सरकारने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रतिक्विंटल 2 हजार 300 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यात ‘अ ‘दर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण 20 रुपयांचा फरक असणार आहे. तसेच यावर्षीही राज्य सरकारकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना भाताची विक्री सरकारी खरेदी केंद्रांवर करायची आहे त्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून देण्यात आली आहे.
खरेदी केंद्र लवकर सुरू करा
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी झोडणीनंतर धान घरी ना आणता तो परस्पर विकण्याचा प्रयत्न असतो. यासाठी लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. हलवा जातीचे भात पीक तयार झालेले आहे. काही दिवसांत खलाट करायची कापणी सुरू होईल यादरम्यान भाताची उचल होणे गरजेचे आहे.
– शांताराम पाटील, प्रयोगशील शेतकरी,अलिबाग
लवकरच जीआर
खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश शासनाकडून प्राप्त झालेले आहेत. काही दिवसांत जीआर निघेल त्यानुसार विक्रीसाठी पाठवलेल्या भाताची आर्द्रता किती असावी, वाहतूक, विक्री पद्धत या संदर्भातील माहिती सहकारी संस्थांना देण्यात येईल. रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारण 28 भात खरेदी केंद्र सुरू केले जातात. यावर्षी तितकेच सुरू होतील. शेतकऱ्यांना वाहतूक करणे सोयीचे होईल, अशाच मध्यवर्ती ठिकाणी केंद्र असतील.
– के. टी. ताटे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी
(Edited by Avinash Chandane)