High Court : सार्वजनिक आरोग्य विभागाने कुत्रे चावण्याचा घटनांची अधिकृत आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात प्रत्येक तासाला कुत्र्यांकडून 90 नागरिकांना चावा घेतला जातो. धक्यादायक बाब अशी की, मुंबई आणि ठाण्यात कुत्रे चावण्याच्या घटनांची सर्वाधिक नोंद होत आहे. दरम्यान, कुत्रा चावल्याच्या प्रकरणात महिला श्वानप्रेमीविरोधातील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करताना आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी कुत्र चावण्याचा घटनांबाबत चिंता व्यक्त करताना श्वानप्रेमींचे कान टोचले आहेत. कुत्रे जरूर पाळा, भूतदयेही दाखवा; पण कुत्रा कुणाला चावणार नाही याची खबरदारी घ्या. कुत्रा कोणाला चावल्यानंतर जबाबदारी झटकू नका, असा ‘संवेदनशील’ सल्ला उच्च न्यायालयाने श्वानीप्रेमींना दिला आहे.
सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील मुणगे गावात कुत्रा चावल्याची तीन वर्षांपूर्वी घटना घडली होती. या घटनेनंतर प्राण्यांबाबत हयगयीचे वर्तन केल्याप्रकरणी श्वानप्रेमी स्नेहल कोळमकर यांच्याविरुद्ध देवगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कोळमकर यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. या अपिलावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी कोळमकर यांच्यातर्फे ऍड. अभिलाष कुरे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी देवगड सत्र न्यायालयातील खटल्याला स्थगिती देण्याचीही विनंती केली होती. यानंतर खंडपीठाने एफआयआरमधील नोंदी तपासल्या आणि श्वान प्रश्नांची सरबत्ती केली.
खंडपीठाने म्हटले की, एफआयआरमध्ये फिर्यादीला कुत्रा चावल्याचे म्हटले आहे. तुम्ही कुत्रा पाळल्याचे कबूल करत आहात. तुम्ही त्याला शिल्लक राहिलेले जेवण खायला देत होता. तसेच कुत्र्याला इंजेक्शन दिले होते आणि त्याची नसबंदीही केली होती. तुम्ही श्वानप्रेमी असल्यामुळे या सर्व गोष्टी केल्यामुळे तुमचे कौतुक आहे. मात्र तुम्ही पाळत असलेला कुत्रा कुणाला चावणार नाही याची खबरदारी घेतली घ्यायला पाहिजे होती. तुम्ही ही जबाबदारी झटकून चालणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आहे. तसेच श्वानप्रेमी स्नेहल कोळमकर यांच्याविरोधातील प्राण्यांबाबत हयगयीचे वर्तन केल्याचा गुन्हा रद्द करण्यास खंडपीठाने नकार दिला आहे. खंडपीठाच्या या भूमिकेमुळे श्वानप्रेमी कोळमकर यांनी आपले अपील मागे घेतले आहे.
याचिकाकर्त्या कोळमकर यांनी खंडपीठापुढे दावा केला होता की, माझ्या घराच्या आवारातील कुत्रा कुणाला चावला नाही. शेजारच्या लोकांच्या वागण्यामुळे आमची कुत्री भुंकतात. यावेळी न्यायमूर्ती सांबरे यांनी कोळमकर यांच्या वकिलांना म्हटले की, ‘साहेब, एफआयआर वाचा.’ वकिलांनी एफआयआर वाचून फिर्यादी बांदेकरला चावलेला कुत्रा आपला नसल्याचा दावा केला. हा युक्तिवाद ऐकताच न्यायमूर्तींनी हसत हसत कोळमकर यांच्या वकिलाला टोला लगावला की, आता पोलिसांनी कुत्र्यांचीही ओळख परेड करायची का? न्यामूर्तींनी म्हटले की, आमच्याकडेही कुत्रे आहेत. पण कुत्रे कुणाला चावणार नाहीत याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे.
श्वानप्रेमी कोळमकर यांनी याचिकेत काय म्हटले?
अपीलकर्त्या कोळमकर यांनी याचिकेत म्हटले की, पोलीसात तक्रार करणारा योगेश बांदेकर हा आधी आमच्या कुंपणात शिरला होता. त्याने आमच्या कुत्र्यावर दगड मारला. तो अधूनमधून सतत कुत्र्यावर दगड मारायचा. त्याला याबाबत जाब विचारला असता त्याने आम्हाला शिवीगाळ केली. आम्ही याबाबत देवगड पोलिसांना कळवले. मात्र दगडफेकीची घटना घडल्यानंतर बराच वेळ देवगड पोलीस घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे आम्ही सिंधुदुर्ग पोलिसांच्या 100 नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर पोलीस आले, मात्र त्यांनी कारवाई करण्याआधी 100 नंबरवर फोन का केला, अशी विचारणा केली. त्याच रात्री पोलिसांनी बांदेकरच्या तक्रारीवरून माझ्याविरोधात एफआयआर नोंदवला. वास्तविक, बांदेकरने कुत्र्याला दगड मारला होता. परंतु, तो रस्त्याने जात असताना कुत्रा चावल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे कोळमकर यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.