HomeरायगडRaigad Road News : यंत्रणांच्या वादात रस्ता भिकार अन् प्रवाशांचे हाल, अलिबाग...

Raigad Road News : यंत्रणांच्या वादात रस्ता भिकार अन् प्रवाशांचे हाल, अलिबाग वडखळ महामार्गाची जबाबदारी कुणाची

Subscribe

अलिबाग : महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या दोन्ही यंत्रणांची या मार्गावरून जोरदार टोलवाटोलवी सुरू आहे. या दोन्ही यंत्रणा या मार्गाची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप होत आहे.

अलिबाग-वडखळ मार्गाची दूरवस्था झाली आहे. अलिबागच्या प्रवेशद्वारातच महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे पर्यटकांचे स्वागत करत आहेत. अशा परिस्थितीत हे दोन्ही विभाग रस्त्याची जबाबदारी झटकत असतील तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल अलिबागकरांसह या मार्गावरील प्रवासी करत आहेत. हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना त्याला राज्य मार्गाचा दर्जा होता. नंतर याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आली. पुढे या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव होता. त्याचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवालदेखील तयार झाला होता. प्रत्यक्षात रस्त्याच्या किमतीपेक्षा भूसंपादनाची किंमत जास्त असल्याने चर्चा मागे पडली. त्यातच याच परिसरात अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प येणार असल्याने चौपदरीकरणाचा प्रस्ताव आपोआप बारगळला.

हेही वाचा…  Uran News : जेएनपीएची समुद्रकोंडी करण्याचा इशारा, हनुमान कोळीवाड्याचे ग्रामस्थ का झाले संतप्त

त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याची विनंती केली. त्यानुसार हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोघेही या रस्त्यांच्या कामाकडे पाहायला तयार नाहीत.

या ररस्त्यावरील खड्यांमुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांना, वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुट्टीच्या दिवशी अलिबागजवळ वाहतूक कोंडी होते. प्रवासाचा वेळ दुप्पट-तिप्पट होतो. महामार्ग विभागाच्या दोन्ही यंत्रणा रस्त्याच्या देखभालीवरून एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे रस्त्याचा कुणाचा आणि दाद कुणाकडे मागावी, असे सवाल उपस्थित होत आहेत.

जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचीच

राजपत्रात नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले की महामार्गाचे हस्तांतरण होते. त्यामुळे अलिबाग-वडखळ मार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचीच आहे.
– यशवंत घोटकर, कार्यकारी अभियंता

अजून प्रक्रिया अपूर्ण

अजूनपर्यंत महामार्ग आमच्या ताब्यात आलेला नाही. हस्तांतरणाची प्रक्रिया अपूर्ण असल्याने आम्ही पुढची कार्यवाही करू शकत नाही.
– शैलेंद्र गुंड, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग, पेण

(Edited by Avinash Chandane)