घररायगड‘दिबां’च्या नावासाठी जिल्ह्यात मानवी साखळी आंदोलन

‘दिबां’च्या नावासाठी जिल्ह्यात मानवी साखळी आंदोलन

Subscribe

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील यांचे नावे देण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर वादाची ठिणगी पडली आहे. भूमिपुत्रांसाठी विविध लढे उभारणारे माजी खासदार दिवगंत दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्याची मागणी महाआघाडीतील घटक पक्ष वगळता भाजप आणि अन्य पक्षांनी केली आहे. यावरून नवी मुंबई आणि परिसरात दोन्ही बाजूंनी जोरदार बॅनरबाजी सुरू असून, यातून निर्माण झालेला वाद आता साखळी आंदोलनाने रस्त्यावर आला आहे.

- Advertisement -

अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापासून मानवी साखळी करण्यात आल्यानंतर शपथ देण्यात आली. तर सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने कर्जत तालुक्यातील नेरळ येथील हुतात्मा स्मारक ते मानिवली येथील हुतात्मा स्मारक या 12 किलोमीटर अंतरापर्यंत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात हजारो भूमिपुत्र, नागरिक, तरुण, महिला सहभागी झाले होते. या आंदोलनात आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, सुरेश टोकरे, मंगेश म्हसकर, राजेश भगत, अरुण कराळे, बाबीताई शेळके, रमेश मुंढे, मनीषा दळवी, वसंत भोईर, अंकुश दुर्गे सहभागी झाले होते.

पेणमध्ये भाजपचे आमदार रवी पाटील यांच्या निवासस्थानापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, नगर पालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, वढावच्या सरपंच पूजा पाटील, गोरख पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकर्यांसाठी जीवन खर्ची घालणार्‍या दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्याची आग्रही मागणी रवी पाटील यांनी केली.

- Advertisement -

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी खालापूर तालुक्यातील आगरी सेना आक्रमक झाली असून, तहसीलदार ईरेश चप्पलवर यांना याबाबत निवेदन देण्यात आले. विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय झाल्यापासून जिल्ह्यातील दि. बा. पाटील यांच्या नावासाठी सुरुवातीपासून आग्रही असलेले कार्यकर्ते, त्यांना मानणारा वर्ग नाराज आहे. आगरी सेना जिल्हाप्रमुख सचिन मते यांच्या नेतृत्त्वाखाली मानवी साखळी करीत निषेध नोंदविण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -