घररायगडस्थगिती आदेशाला केराची टोपली ,पोशीरमध्ये अनधिकृत टॉवर उभारणी

स्थगिती आदेशाला केराची टोपली ,पोशीरमध्ये अनधिकृत टॉवर उभारणी

Subscribe

कर्जत तालुका पंचायत समितीसह पोशीर ग्रामपंचायतीने दिलेला स्थगिती आदेश धुडकावून टॉवर उभारणीच्या कामास पुन्हा सुरुवात झाली असून, ग्रामपंचायतीने अचानक ‘नरोवा कुंजरोवा’ अशी भूमिका घेतल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

पोशीर गावातील एका खासगी जागेत एअरटेलच्या टॉवर उभारणीस दीड महिन्यांपूर्वी सुरुवात झाली होती. ही खासगी जागा सर्वे क्रमांक 196/7 गावठाण जागेने वेढलेली असून, या पॉईंंटच्या 100 मीटर परिघात शाळा, मंदिर, दवाखाने आणि अंगणवाडी, तसेच निवासी इमारती आहेत. या टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांसह पत्रकारांनी या टॉवर उभारणीस आक्षेप घेतला. या संदर्भात तक्रार अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद, तहसीलदार आणि जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आला. याची पंचायत समितीने दखल घेत 26 एप्रिल रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भालेराव यांनी पाहणी करून काम थांबविण्यास सांगितले. त्यानंतर ग्रामपंचायतीने इंडस टॉवर लिमिटेड या ठेकेदार कंपनीला काम बंद करण्याचे आदेश देत सर्व परवानग्या सादर करण्यास सांगितले.

- Advertisement -

मात्र तरीही 3 जूनपासून ठेकेदाराने शासकीय स्थगिती आदेश डावलून मनमानीपणे काम सुरू केले आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता ठेकेदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने स्थगिती आदेश कायम असून, काम थांबविण्याबाबत पत्र जारी केले, मात्र या पत्रावर सरपंच आरती राणे यांनी सही करण्यास नकार दिला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात तक्रारदारांना माहिती देण्यात आलेल्या पत्रावर सही देण्यासही नकार दिला, तसेच पंचायत समितीला दिलेल्या पत्रावरही सही केलेली नाही. बेकायदेशीर टॉवरला दिल्या गेलेल्या ना हरकत दाखल्यावर विनाविलंब सही करणार्‍या सरपंच राणे कारवाईच्या इतर पत्रांवर सही का करीत नाहीत, हे मात्र समजू शकले नाही.

इंडस टॉवर या ठेकेदार कंपनीने आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या यांची पूर्तता न केल्याने कामास स्थगिती आदेश दिले आहेत. तरीही काम सुरू केल्याने त्यांना पुन्हा पत्र देऊन त्वरीत काम बंद करण्यास सांगितले आहे. मात्र या पत्रावर सरपंचांनी सही करण्यास नकार दिला आहे.
-अशोक रौदळ, ग्रामविकास अधिकारी

- Advertisement -

सदर टॉवर प्रकरण हे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय आहे. मात्र या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले जाईल.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी

टॉवरच्या उभारणीसाठी कागदपत्रांची पूर्तता केलेली नसताना त्वरीत ना हरकत देणारी पोशीर ग्रामपंचायत आणि मनमानीपणे टॉवर उभारणीचे काम सुरू करणारी इंडस टॉवर कंपनी ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे. सदर काम त्वरीत बंद करण्याची कारवाई व्हावी.
-कृष्णा हाबळे, रहिवासी, टॉवर परिसर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -