रायगड जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींचा भर ५४५ ग्रामसेवकांवर

In Raigad district, 810 gram panchayats have been shifted to 545 gram sevaks
रायगड जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींचा भर ५४५ ग्रामसेवकांवर

गावाचा विकास आणि समृद्धीचा मार्ग हा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून जात असतो. अनेक विकासकामांना येथून मंजुरी मिळते. यातून गाव सुजलाम सुफलाम होत असतो. यासाठी गावाच्या स्थानिक सदस्यांसह ग्रामसेवक शासनाचा सदस्य म्हणून आपली भूमिका पार पाडत असतात. मात्र जिल्ह्यातील ८०० च्यावर असलेल्या ग्रामपंचायतींचा भार हा ५४५ ग्रामसेवकांवर येऊन पडला आहे. त्यात अनेक रिक्त पदांचा फटका हा ग्रामपंचायतींच्या विकास कामांवर होत असून कामात दिरंगाई होत आहे.

शहराचा कारभार हा नगरपालिकेतून तर गावाचा कारभार हा ग्रामपंचायतमधून चालत असतो. गावाचा विकास होण्यासाठी शासन स्तरावरून ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती या शासन संस्थांच्या माध्यमातून निधीची पूर्तता केली जाते. तर गावातील घरपट्टी, पाणीपट्टी, रहिवासी दाखला, व्यवसायाचा दाखला यासारखे दाखले, घरकूल योजना आदी शासकीय योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात राबवल्या जातात. यासाठी ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य अशी व्यवस्था असते. तर या सर्वांवर शासनाचा अंकुश राहत शासकीय सदस्य म्हणून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे काम पाहत असतात. एक हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक असतात. तर दीड हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. असे असले तरी रिक्त पदांचा भार या ग्रामसेवकांवर देखील पडत आहे.

रायगड जिल्ह्यात १५ तालुक्यांत एकूण ८१० ग्रामपंचायती आहेत. त्यातील ग्रामसेवक यांची मंजूर पदांची संख्या ही ५४९ आहे. तर कार्यरत ग्रामसेवक संख्या ही ४५० असून ९९ जागा रिक्त आहेत. जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी यांची मंजूर पदांची संख्या ही १११ आहे. तसेच कार्यरत ग्रामविकास अधिकारी ९५ असून १६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे तब्बल ११५ रिक्त जागांचा भार हा कार्यरत ग्रामसेवकांवर पडतो आहे. एका ग्रामसेवकांवर २-३ यासह अगदी चार ग्रामपंचायतीचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. त्यात शासकीय बैठका, प्रशिक्षण, इतर कामे आदींमुळे ग्रामपंचायतींचा कारभार हाकताना ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. या अतिरिक्त कामाकरिता आठवड्यातील वार ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत. या वारांसाठी डोळे लावून बसण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. यातून अगदी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा मुख्यालयी ग्रामसेवक सापडत नाहीत तेव्हा चुकी नसताना देखील ग्रामस्थांच्या रोषाला ग्रामसेवकाना सामोरे जाण्याची वेळ ग्रामसेवकांवर आली आहे.

शासनाच्या योजनांची काम, महसुलाची, कृषीची कामे अशी स्वतंत्र विभाग असलेली कामेदेखील ग्रामसेवकांकडे दिली जातात. इतर विभागांची कामे ग्रामसेवकांवर पडल्याने ग्रामसेवकांची मूळ कामे त्यांना करता येत नाही. यामुळे विनाकारण नागरिकांच्या मनात त्या ग्रामसेवकांबद्दल अविश्वास निर्माण होतो.

एन.टी.म्हात्रे, अध्यक्ष ग्रामसेवक संघटना, रायगड जिल्हा

जिल्ह्यातील ग्रामसेवकांवर अतिरिक्त भार आहे. मंजूर पदांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र शासनाकडून ग्रामसेवक भरती बंद आहे. भरतीला संमती मिळताच ही पदे भरली जातील.
डॉ.किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप.


हे ही वाचा – पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावरच खड्डा, आयुक्तांसह महापौरांची त्याच रस्त्यावरुन ये-जा