पोलादपूरात विषाणूजन्य आजारांचा वाढता फैलाव

अवकाळी पाऊस, कडक उन्हाळा संध्याकाळी गारवा आणि रात्री पुन्हा गरमा यामुळे हवामानात सतत बदल घडत असल्याने सर्दी,खोकला, ताप, डोकेदुखी, जुलाब, त्वचारोग, पाठदुखी श्वसन रोग आदी आजाराने तालुक्याच्या सर्वदूर शहरासह ग्रामीण भागाला ग्रासले असून शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात दिवसाआड अशा विषाणूजन्य आजारांच्या रूग्णांची वाढ होत आहे.

 

पोलादपूर: अवकाळी पाऊस, कडक उन्हाळा संध्याकाळी गारवा आणि रात्री पुन्हा गरमा यामुळे हवामानात सतत बदल घडत असल्याने सर्दी,खोकला, ताप, डोकेदुखी, जुलाब, त्वचारोग, पाठदुखी श्वसन रोग आदी आजाराने तालुक्याच्या सर्वदूर शहरासह ग्रामीण भागाला ग्रासले असून शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात दिवसाआड अशा विषाणूजन्य आजारांच्या रूग्णांची वाढ होत आहे.
सध्या शहरासह ग्रामीण भागातील पारलेदिवील, लोहारे पोलादपूर, चरई सडवली, धामणदेवी, भोगाव खुर्द, सुतारवाडी, भरणेवाडी, भोगावबुद्रक, कामतवाडी आदी गाववाड्यांच्या परिसरातून मुंबई -गोवा महामार्ग जात आहे. त्यामुळे या परिसरात पंधरा हजारापेक्षा अधिक वृक्षांची बेसुमार तोड झाली आहे. त्यामुळे या गावांना सकाळी दहानंतर संध्याकाळी पाचपर्यंत प्रचंड प्रमाणावर उष्णतेच्या झळां बसत आहेत तसेच संपूर्ण तालुक्यात पडलेला पाऊस आणि सर्वदूर भागात दोन दिवसांपासून आकाशात निर्माण होणारे मळभ याची भर पडली असल्याने वातावरणात सतत बदल घडून त्याचा परिणाम विषाणूजन्य आजारांचा सर्वत्र फैलाव होत आहे.

या संदर्भात पोलादपूर येथील डॉ. समीर साळुंखे म्हणाले, वसंत ऋतुच्या प्रारंभापासून वातावरणात बदल घडत असतात. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडण्याऐवजी लोकांनी घरी रहाणे उत्तम ठरते. काही महत्वाच्या कामाकरीताबाहेर पडणे आवश्यक असेल तर छत्री वापरावी, घरी फ्रिजमधील पाणी पिऊ नये . मातीच्या माठातील पाणी प्यावे, वातावरणातील बदलामुळे विशेषतः सर्दी खोकला आणि ताप आदी आजारांचे रुग्ण अधिक उपचारासाठी येत आहेत. तसेच पचनाचे आजार जुलाब या आजाराचे रूग्णही आहेत.

 जनतेला वैद्यकीय सेवा द्यावी

तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उप आरोग्य केंद्रे असून वैद्यकिय अधिकारी परिचारीका पर्यवेक्षक आरोग्य सेवक-सेविका आशा स्वयंसेविका आदी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तालुक्यात सेवारत आहेत. त्यांनी गावोगावी वाड्या वस्त्यांवर फिरुन ग्रामीण जनतेला वैद्यकीय सेवा द्यावी, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.

कडक उन्हामुळे शरिरातून घामाच्या धारा वाहतात त्यामुळे त्वचा आजाराची शक्यताही डॉ साळूंखे यांनी बोलून दाखवली सर्दी पडसे आणि तापांच्या रुग्णांचे प्रमाण बाह्यरुग्ण विभागात दर दिवशी ४० टक्के पेक्षा अधिक आहेत.
– डॉ . भाग्यरेखा पाटील,
मुख्य वैद्यकीय अधिकारी