रेशनिंग दुकानदाराविरोधात पाचाडमध्ये बेमुदत उपोषण सुरूच

ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रेशनिंग दुकानदाराकडून रेशन धारकांना कमी प्रमाणात धान्य देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या वतीने शाश्वत धेंडे यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसर्‍या दिवशी देखील सुरूच राहिले आहे.

महाड: ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रेशनिंग दुकानदाराकडून रेशन धारकांना कमी प्रमाणात धान्य देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या वतीने शाश्वत धेंडे यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसर्‍या दिवशी देखील सुरूच राहिले आहे.
पाचाड गावामध्ये सुमारे ३८० रेशन कार्डधारक आहेत. या ठिकाणी रेशनिंग दुकान चालवत असलेल्या दुकानदाराकडून रेशन नेण्यास आलेल्या रेशन कार्ड धारकांना व अपमानास्पद वागणूक देणे तसेच शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात धान्य दिले जात असल्याचा आरोप करत धेंडे यांनी दोन महिन्यांपूर्वी महाड तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती मात्र या तक्रारीची दखल न घेतल्याने शाश्वत झेंडे आणि ग्रामस्थांनी पाचाड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा हा तिसरा दिवस असून जोपर्यंत रेशन दुकानदाराचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांच्या वतीने शाश्वत धेंडे यांनी घेतला आहे.
पाचाड येथे असेलल्या परवानाधारक रेशनिंग दुकानदार राजेंद्र खातू यांनी आपले दुकान युनुस सय्यद या व्यक्तीस चालवण्यात दिले होते मात्र या दुकानदाराकडून दुकानात आलेल्या रेशनिंग धारकांना अपमानास्पद वागणूक देणे तसेच कमी प्रमाणात धान्य दिले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात धान्य दिले जात असल्याचे ऑनलाईन पावतीनुसार उघड झाले आहे.
पाचाड मधील अनेक लोकांच्या ऑनलाईन पावत्या आणि दिले जात असलेले धान्य यामध्ये तफावत असल्याचे शाश्वत दंडे यांनी प्रशासनासमोर उघड केले, तरी देखील कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने अखेर धेंडे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. त्यानुसार दिनांक २२ फेब्रुवारीपासून उपोषण आंदोलन सुरू झाले आहे. महाड नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संबंधित दुकानदारावर योग्य ते कारवाई केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन दिले, तसेच तहसीलदार कार्यालयाकडून अशा प्रकारचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्याचे सांगितले व पत्राची प्रत देखील देंडे यांना दिली. मात्र परवाना रद्द झाल्याचे लेखी पत्र जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच पद्धतीने सुरू राहील असे जाहीर केले. यावेळी पाचाड ग्रामस्थ व माजी सरपंच देविदास गायकवाड यांनी देखील रेशन दुकानदाराच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला.

गोरगरीब जनतेला न्याय द्यावा
गेली पाच वर्ष या दुकानदाराकडून गोरगरीब जनतेचे धान्य लुबाडले गेले आहे. ते धान्य शासनाने वसूल करावे व रेशनिंग दुकानदारांना भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली. तर रघुवीर देशमुख यांनी देखील या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाने योग्य ते कारवाई करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा असे सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मोहन खांबे यांनी देखील उपोषणास पाठींबा दिला आहे.

पाचाड मधील ग्रामस्थ शाश्वत धेंडे यांनी ज्या कारणासाठी उपोषण सुरु केले आहे ते योग्य असून ग्रामपंचायतीने प्रशासनाला याबाबत कळवले आहे. शिवाय सरपंच म्हणून मी स्वत: याठिकाणी भेट दिली आहे.
– संगीता महेश बेंदूगडे