Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर रायगड पाचाडमध्ये जनता कर्फ्यू

पाचाडमध्ये जनता कर्फ्यू

शिवप्रेमींनी गर्दी न करण्याचे आवाहन

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील पाचाड ग्रामपंचायतीने गावबंदीचा निर्णय घेतला असून, येत्या ६ जून रोजी गड परिसरात पर्यटक आणि शिवप्रेमींनी गर्दी करू नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

किल्ले रायगडावर ६ जून रोजी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षापासून देशात कोरोनाचे संकट असल्याने मोजक्या उपस्थितीत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार छ. युवराज संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक दिन गडावर साजरा केला होता. यावर्षी या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनाची सुरुवात करण्याचा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावाने मात्र जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. गावात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने गावबंदी केली असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

- Advertisement -

या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आणि मराठा आरक्षण आंदोलनच्या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता आहे. विविध भागातील आणि कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात येणार्यांमुळे धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने पाचाड, पाचाड गाव, रायगडवाडी, हिरकणीवाडी आदी गावांतील ग्रामस्थ धास्तावले आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय शासनाने ६ जूनपूर्वी घ्यावा अन्यथा त्याच दिवशी साजरा होत असलेल्या शिवराज्यभिषेक दिनी रायगडावर आंदोलन सुरू करण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केले असल्याने पाचाड परिसरांमध्ये कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होणार आहे.

पाचाडचे सामाजिक कार्यकर्ते अनंत देशमुख, माजी संरपंच राजेंद्र खातू, रघुवीर देशमुख, मधुकर गायकवाड, शिवा शेडगे, हिरकणी वाडीतील लहू अवकीरकर, गणेश अवकीरकर, जयेश लामजे, रायगडवाडीचे प्रभाकर सावंत, अनंत अवकीरकर, राजा शिंदे यांच्यासह परिसरांतील ग्रामस्थांच्या बैठकीत पाचाड ग्रामपंचायत परिसरामध्ये ६ जूनपर्यत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बाहेरून येणार्या कोणाही व्यक्तीला गावामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून, वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

रायगडावरील कार्यक्रमा संदर्भामध्ये कोणतीही परवानगी मागण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे.-प्रतिभा पुदलवाड, प्रांत, महाड

पाचाड आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गावपातळीवर गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक दिनी मराठा आरक्षण आंदोलनचा इशारा दिल्याने मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी गड परिसरात आल्यास ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.- कु.संयोगीता गायकवाड, माजी सरपंच

- Advertisement -