रस्ते, गटारांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगत कर्जत पालिकेकडून बोळवण

पावसाळ्यात गटार आणि रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने कित्येकदा अपघातही झाले आहेत. तरी नगरपरिषद काहीच भूमिका घेत नाही. तसेच वाहनांची वर्दळ असल्याने रस्ता खचून गटारामध्ये जात आहे. झाडे झुडपांनी विळखा घेतला असल्याने गटार पूर्ण झाकून गेले आहे.

कर्जत नगरपरिषद हद्दीतील नानामास्तर नगरमधील मुद्रे येथील रस्ता व गटारांची कामे मागील पंधरा वर्षांपासून केलेली नाहीत असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांनी वेळोवेळी या मूलभूत कामांबाबत पत्रव्यवहार करून ही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नगरपरिषदेवर नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाना मास्तरमधील रस्ते आणि गटारांची समस्या सोडविण्यास तेथील नगरसेवकांना अपयश असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. ठाकरे चौक पासून ते प्रितेश बोंबे यांच्या घरा पर्यंत म्हणजे २५०मीटरचा रस्ता नगरपालिकेला करता आला नाही. यासंदर्भात नगराध्यक्षा यांची नागरिकांनी भेट घेऊन प्रश्न मांडले असता आमच्याकडे सद्या निधी उपलब्ध नसून तुम्ही निधी आणून द्या मग आम्ही कामे करून देतो असे उत्तर दिल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. जर नित्यनेमाने जनता कर भरते तर त्या कराचे काय केले जाते. तसेच २०२०-२०२१ मध्ये जमा झालेल्या करातून नगरपालिका ९० कोटी रुपयांची कामे कर्जत शहरात करत आहे. तर ते ९०कोटी कुठे खर्च करणार आहेत याचा खुलासा नागरिक मागत आहे.

बांधकाम विभागाचे अधिकारी मनीष गायकवाड यांच्याशी चर्चा केली तर निधी उपलब्ध होईल. त्यावेळेस रस्ता व गटारेची कामे करण्यात येईल असे उत्तर दिले जात आहे.तसेच याबाबात तत्कालीन नगरसेवक धनंजय दुर्गे व नगरसेविका भारती पालकर यांनी सांगितले की, मासिक सभेत प्रश्न मांडला जातो, परंतु यावर नगराध्यक्षा यांची काहीच प्रतिउत्तर मिळत नाही. कदाचित नानामास्तर नगर मधील लोकप्रातिनिधी यांना प्रश्न सोडवायचा नसेल म्हणून कामाला निधी दिला जात नसल्याचे प्रितेश बोंबे यांचे म्हणणे आहे. तसेच पावसाळ्यात गटार आणि रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने कित्येकदा अपघातही झाले आहेत. तरी नगरपरिषद काहीच भूमिका घेत नाही. तसेच वाहनांची वर्दळ असल्याने रस्ता खचून गटारामध्ये जात आहे. झाडे झुडपांनी विळखा घेतला असल्याने गटार पूर्ण झाकून गेले आहे. त्यामुळे वाहन धारकांना अंदाज येत नसल्याने अनेकवेळा गटारात वाहने गेली आहेत.

पावसाळा आधी जर रस्ता आणि गटार केले नाही तर नगरपरिषद कार्यालयासमोर नानामास्तर नगरमधील रहिवाशी उपोषणाला बसू असा इशारा प्रिंतेश बोंबे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना शेखर मुकू, कांतीलाल दातीर, मच्छीन्द्र कुलाळ, अमोल पाटील, प्रणित कांगने आदींनी सह्या करून रस्ते गटार करण्याची मागणी केली आहे.

डम्पिंग ग्राउंड येथील रस्ता करण्यासाठी निधी आहे. त्यासाठी निधी खर्च करण्याची आवश्यकता नसतानाही केला जातो. तसेच काही ठिकाणी अजून वस्ती निर्माण झाली नाही तरी देखील स्वतःच्या हितासाठी लाखो रुपये खर्च करून रस्ता केला जात आहे. मात्र ज्या ठिकाणी खरीच गरज आहे त्या ठिकाणी दुर्लक्ष केले जात आहे.