खोपोली : खालापूर तालुक्यातील काही रस्त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की खड्ड्यांमुळे प्रवासी आणि वाहनचालकांना फक्त त्रास आणि त्रासच सहन करावा लागत आहे. घोडीवली-अंजरुन गाव हा रस्ता याचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. आता तर हा रस्ता ‘खड्डेमार्ग’ म्हणून ओळखला जात आहे. कारण अनेक वर्षांत या रस्त्याला डांबर लागल्याचे ग्रामस्थांनी पाहिलेले नाही. प्रत्येक गावात चांगला रस्ता, खड्डेमुक्त रस्त्ये अशी भाषणे करणाऱ्यांनी मंत्र्यांनी वास्तव पाहिले तर ग्रामीण भागातील लोकांचे दयनीय रस्त्यामुळे किती हाल होतात, याची जाणीव होईल, याकडे खालापूरकर लक्ष वेधत आहेत.
आमदार थोरवे इकडे लक्ष द्या!
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील घोडीवली-अंजरुन रस्त्यावरून वाहने चालवणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ, वाहनचालकांमध्ये संतापाची लाट आहे. या मार्गावरून वृद्ध किंवा महिला, ज्येष्ठांना जाताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. या मार्गावरील पुलाचीदेखील अनेक वर्षांपासून दूरवस्था झाली आहे. या पुलाचे संरक्षण कठडे गायब झाल्याने असुरक्षित वाटते. एकीकडे सरकार रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत असल्याचे सांगते, त्याचवेळी ग्रामीण भागातील रस्त्यांना साधी डांबरही लागत नाही, हा केवढा विरोधाभास असल्याकडे ग्रामस्थ लक्ष वेधत आहेत.
हा मतदारसंघ शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा आहे तर या रस्त्याची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची आहे. महेंद्र थोरवे पाच वर्षे आमदार होते आणि आताही ते आमदार आहेत. मतदारसंघात हजारो कोटींची निधी आणल्याचा दावा ते नेहमी करतात. मगा घोडीवली-अंजरून हा अंदाजे दीड किलोमीटरचा रस्ता तयार का होत नाही, हा ग्रामस्थांचा प्रश्न आहे.
सुखाचा प्रवास कधी?
घोडीवली-अंजरुन रस्त्याची अनेक वर्षांपासून चाळण झाली आहे. लोकांचे हाल होत असूनही या रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. प्रशासनाने याचे गांभीर्य घेत नवी रस्ता करून लोकांचा प्रवास सुखाचा होईल, असे पाहावे.
– नवज्योत पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते, घोडीवली
(Edited by Avinash Chandane)