कर्जत : आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या चिमुरडीचा हातगाडीला शॉक लागून मृत्यू झाला. नेरळ खांडा येथे बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. नेरळ खांडा येथील दिव्या दीप नाक्यावर हॉटेल टीवाळे आहे. या हॉटेलबाहेर एक सरबताची हातगाडी असून तिला हॉटेलमधून विद्युत जोडणी देण्यात आली आहे. बुधवारी (20 नोव्हेंबर) रात्री या हॉटेलमध्ये आईस्क्रीम घेण्यासाठी आपल्या भावंडांसह गेलेली 6 वर्षांची चिमुरडी हातगाडीला शॉक लागून तिथेच कोसळली. स्थानिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा… Crime : गॅस कटरने खिडकी कापली, बँकेत प्रवेश केला अन् चोरट्यांचा जवळपास 14 कोटींच्या सोन्यावर डल्ला
बोपेले हजारे नगर भागात रफिक खान आणि त्यांचे कुटुंब राहते. रफिक खान हे दृष्टिहीन असून यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असे पाच जणांचे कुटुंब आहे. मूळचे मुक्ताईनगरमधील हे कुटुंब नेरळ परिसरामध्ये भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. मोठी मुलगी रायमिन खान (6) हिला अलीकडेच पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळाला होता. बुधवारी नेरळ बाजारपेठ परिसरात भिक्षा मागून जे काही पदरी पैसे होते ते घेऊन हे कुटुंब घरी निघाले होते. तेव्हा खांडा येथील हॉटेल टीवाळे येथे आले असताना रायमिनने आईस्क्रीम मागितले. वडील आणि आईने मुलांची हौस म्हणून परवानगी दिली आणि आईवडिलांनी स्वतःसाठी चहा घेतला. आईस्क्रीम खाताना रायमिन खेळत खेळत समोर असलेल्या सरबताचा गाडीच्या दिशेने गेली. त्या गाडीला तिचा हात लागल्यावर तिला अचानक विजेचा झटका लागला. पाठीमागे असलेली तिची लहान बहीण झोया हिने हा प्रकार पहिला मात्र तिला काही कळले नाही. त्यामुळे तिने आईवडिलांना हाक मारली. ते पुढे येईपर्यंत रायमिन जमिनीवर कोसळून निपचित पडली. हा प्रकार पाहून स्थानिकांनी तिला धन्वंतरी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासले मात्र, तोपर्यंत तिचा मत्यू झाला होता.
हेही वाचा… Women Candidate : रायगडमधील त्या चारचौघी बाजी मारणार ? 73 पैकी अवघ्या 10 महिला उमेदवार
टीवाळे हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर सरबताची हातगाडी बेकायदा असून हॉटेलमालकाच्या कृपेने ती सुरू आहे. या हातगाडीला हॉटेलमधून विजेची जोडणी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही हातगाडी स्टीलची असून बंद असलेल्या गाडीचा वीजप्रवाह का सुरू ठेवला, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान नेरळ-कर्जत रस्त्यावर अशा अनेक हातगाड्या उभ्या असून सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे मिटून शांत बसला आहे. या बेकायदा गाड्यांमुळे आणि त्यांच्यावर कृपा असलेल्या अशा हॉटेलमालकामुळे एका चिमुरजीचा जीव गेला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात बीएनएस कायदा कलम 194 नुसार अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या हॉटेलमालकावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited by Avinash Chandane)