घररायगडमाथेरानच्या हातरिक्षांना लॉकडाऊनचा ब्रेक!

माथेरानच्या हातरिक्षांना लॉकडाऊनचा ब्रेक!

Subscribe

कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने लॉकडाऊन लागू केल्यानंतर पर्यटकांची वर्दळ घटल्याने हातरिक्षा व्यवसायाला करकचून ब्रेक लागला असून, स्वाभाविक या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ३०० कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या या शहरात पर्यावरणाच्या कडक अटींमुळे वाहनांना परवानगी नसल्यामुळे घोडा, ट्रेन किंवा हातरिक्षा यांचाच पर्याय शिल्लक असतो. मात्र कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने लॉकडाऊन लागू केल्यानंतर पर्यटकांची वर्दळ घटल्याने हातरिक्षा व्यवसायाला करकचून ब्रेक लागला असून, स्वाभाविक या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ३०० कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने ही परिस्थिती लक्षात घेऊन मदतीचा हात द्यावा, अशी मागणी श्रमिक रिक्षाचालकांनी शासनाकडे केली आहे.

पहिल्या लॉकडाऊनमधून कसे बसे सावरून कामाला लागलो तर आता परत लॉकडाऊन सुरु झाले आहे. पर्यटक नसल्याने हातरिक्षा बंद आहेत. तेव्हा आता कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न समोर आहे.
– गणपत रांजणे, हातरिक्षा चालक

- Advertisement -

समुद्र सपाटीपासून ८०० मीटर उंच असणारे हे ठिकाण पूर्णतः प्रदूषणमुक्त असल्याने या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. पर्यावरणाबाबतीत अनेक अटी असल्याने येथील आर्थिक गाडा हा पर्यटन व्यवसायावरच अवलंबून आहे. आरोग्य, अग्निशमन दल या अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इंधनावरील इतर वाहनांना येथे बंदी आहे. येणार्या पर्यटकांवरच घोडेवाले, हातरिक्षावाले, यासह हॉटेल आणि इतर छोटे-मोठे उद्योग अवलंबून आहेत. उन्हाळी सुट्टी, पावसाळा, दिवाळी, नाताळ, ३१ डिसेंबर आणि नवीन वर्ष मुख्यतः पर्यटन हंगाम असून, याचवेळी व्यवसायाला सुगीचे दिवस असतात. या पर्यटन हंगामावरच येथील कुटुंबांचे वर्षभराचे अर्थाजन अवलंबून असते.

लॉकडाऊन सुरु आहे त्यामुळे हातरिक्षा बंद झाल्या आहेत. कोरोना वाढतोय त्यामुळे लॉकडाऊन आहे हे समजतंय पण हातावर कमावून पानावर खाणारी माणसं आम्ही कमावलंच नाही तर खाणार काय? कोरोना होईल की नाही हे माहित नाही, पण पोटाची भूक आज ना उद्या बळी घेईल हे नक्की.
– दिनेश कदम, हातरिक्षा चालक

- Advertisement -

गेल्या लॉकडाऊनपासून येथील पर्यटन व्यवसायाला मोठी झळ बसली असून, अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आलेली आहे. पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याने रिक्षाचालकांना सर्वात मोठा फटका बसला आहे. पर्यटक नसल्याने हातरिक्षावाले हतबल झाले आहे. ब्रिटीश काळापासून सुरू असलेला हातरिक्षा व्यवसाय आजही अस्तित्त्वात आहेत. एकूण ९४ हातरिक्षा आहेत. एका रिक्षाला तिघेजण ओढतात. थोडक्यात एका रिक्षावर ३ माणसे पोट भरतात. या सर्व रिक्षांवर साधारण ३०० कुटुंबे अवलंबून आहेत. त्यातील काही महाराष्ट्रातील इतर भागातून येऊन हे काम करत आहेत.

माथेरानमधील हातरिक्षा चालकांना पर्यटक नसल्याने दुसरा कुठलाही आर्थिक पर्याय उपलब्ध नाही. तेव्हा रिक्षाचालकांना जसे शासनाने १५०० रुपयांचे पॅकेज जाहीर केले त्यात हातरिक्षाचालकांना देखील शासनाने सामावून घ्यायला हवे. हातरिक्षाचालक माथेरान खेरीज महाराष्ट्रात अन्य कुठेही नाही तेव्हा शासनाने यावर अवलंबून असलेल्या जवळपास ३०० कुटुंबांचा विचार करणे गरजेचे आहे. हि बाब आम्ही रायगडच्या पालकमंत्री यांच्याकडेही मांडलेली आहे. तेव्हा शासनाने याचा विचार करण्याची गरज आहे.
– सुनील शिंदे, सचिव, श्रमिक रिक्षा चालक संघटना

रक्ताचे पाणी करून हातरीक्षा ओढणारी ही कष्टकरी मंडळी आता कुटुंबाला कसे पोसायचे, या विवंचनेत आहेत. अन्य पर्यायी व्यवसायाची सोय उपलब्ध नसल्याने केवळ पर्यटनावर सर्वांचे जीवन रामभरोसे आहे. सध्या अत्यंत हलाखीचे जीवन ही श्रमिक मंडळी कंठीत आहेत. अतिकष्टदायक हे काम असल्यामुळे अल्पायुष्यात अनेकांना आपली जीवनयात्रा संपवावी लागली असून, त्यांची कुटुंबे वार्यावर आहेत. या व्यवसायात बदल घडवून आणण्यासाठी शासनाने लक्ष केंद्रित केलेले नसल्याने निदान लॉकडाऊनच्या काळात तरी मदतीचा हात मिळावा या प्रतीक्षेत हातरिक्षाचालक आणि त्यांचे कुटुंबीय आहेत.

(दिनेश सुतार ः लेखक माथेरान वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

Double Mutant, वेरीयंट्स विरोधात Covaxin प्रभावी, ICMR चे शिक्कामोर्तब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -