महाड चवदार तळे सत्याग्रहाला प्रथमच सरकारी मानवंदना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये महाडमध्ये सामाजिक क्रांती केली. या सत्याग्रहाची दखल जगभरात घेतली गेली. तेव्हापासून लाखो अनुयायी चवदारतळे येथे येऊन महामानवाला अभिवादन करतात. मात्र यावर्षी पहिल्यांदा महाड येथे सरकारी मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच त्यादिवशी या परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल असे आदेश रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी दिले आहेत.

महाड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये महाडमध्ये सामाजिक क्रांती केली. या सत्याग्रहाची दखल जगभरात घेतली गेली. तेव्हापासून लाखो अनुयायी चवदारतळे येथे येऊन महामानवाला अभिवादन करतात. मात्र यावर्षी पहिल्यांदा महाड येथे सरकारी मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच त्यादिवशी या परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल असे आदेश रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
महाड चवदार तळे सत्याग्रह, क्रांतीस्तंभ येथे १९ आणि २० मार्च या ऐतिहासिक दिवशी लाखो आंबडेकर जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमा होत असतात. यावेळी प्रथमच सरकारी रीतिरिवाजानुसार मानवंदना देण्यात येणार आहे. दादर येथील चैत्यभूमी येथे ज्याप्रमाणे सरकारी मानवंदना देण्यात येते, त्याप्रमाणे म्हाडा क्रांतीस्तंभ येथेही सरकारी मानवंदना देण्यात आली पाहिजे, परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात यावी, अशी मागणी कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि इतर अनेक सामाजिक धार्मिक संघटनांनि मागणी केली होती. रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. राज्य सरकारने तत्काळ मंजुरी दिली असून या वर्षांपासून आता महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाला सरकारी मानवंदना देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी दिली.
दरवर्षी आंबेडकर अनुयायी सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी महाड येथे येत असतात. महाड येथे येणार्‍या अनुयायांना रेल्वे बस सेवा, पिण्याचे पाणी, सुलभ सुविधा, आरोग्य तपासणी, तात्पुरता निवारा, बस थांबा, वाहन पार्किंग व्यवस्था इ.सुविधा पुरविणे व त्यात समन्वय असणे आवश्यक आहे. याकरिता सामाजिक संघटना व संबंधित शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय राहण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना यांची एकत्रित बैठक १६ मार्चला रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, सुनिल जाधव, महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, सहाय्यक संचालक आरोग्य डॉ.प्रताप शिंदे, गट विकास अधिकारी वाय.एस.प्रमे, तहसिलदार सुरेश काशिद, महाड पोलीस निरीक्षक एम.पी. खोक, पोलीस निरीक्षक (वाहतूक) रायगड अलिबाग सुवर्णा प्रसाद पत्की, महाड नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव शेडगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे तसेच कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था,महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रकाश मोरे, सचिव पत्रकार दिपक पवार, पत्रकार राजा आदाटे, शरद मोरे, मोहन घाडगे, आदि मान्यवर उपस्थित होते.

सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचा इशारा
जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. दिला आहेत. अधिकाधिक शौचालये, स्वयंसेवक यांच्यामध्ये वाढ करणे, नगरपालिका कर्मचारी व स्वयंसेवक यांना ओळखण्यासाठी ओळखपत्र देण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात येणार्‍या सोयी – सुविधांबाबत व्हिडिओ क्लिप बनवून सामाजिक माध्यमांव्दारे प्रकाशित करण्याच्या सूचना महाड उपविभागीय अधिकारी पुदलवाड यांना दिल्या. आढावा बैठकीदरम्यान महाड नगरपरिषद मुख्याधिकारी रोडगे यांनी येणार्‍या अनुयायांना देण्यात येणार्‍या आरोग्यविषयक सुविधा, पाणीपुरवठा सुविधा, स्वच्छता सुविधा याबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था -महाराष्ट्रचे अध्यक्ष व सचिवांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ही समन्वय आढावा बैठक घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.