महाड : येथील औद्योगिक क्षेत्रातील ए. एल. जी कंपनीकडून प्रदूषणाच्या नियमाचा वारंवार भंग केला जात आहे. कंपनीच्या आवारातून अन्य कंपन्यांच्या आवारात आणि नाल्यामध्ये प्रदूषित पाणी सोडले जात असून याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून कारवाई केली जात नसल्याने हा त्रास वाढतच आहे. म्हणूनच परिसरातील रहिवाशांकडून ही कंपनी बंद करण्याची मागणी होत आहे.
महाड एमआयडीसीमधील लघु कारखान्यांकडून सातत्याने प्रदूषणाच नियम पायदळी तुडवले जात आहेत. कंपनीतील रासायनिक सांडपाणी शेजारील मोकळ्या प्लॉटमध्ये सोडले जात असून तेथून ते नाल्याला जाऊन मिळत आहे. काही दिवसांपूर्वी याच कंपनीतील रासायनिक सांडपाणी अशाच पद्धतीने नाल्याला मिळून जिते नाला प्रदूषित झाला होता. ही घटना ताजी असली तरी कंपनीच्या आवारातून रासायनिक सांडपाणी मोकळ्या जागेतून वाहण्याचे अजून थांबलेले नाही. गंभीर बाब म्हणजे हे सांडपाणी घातक नाही आणि ते शेजारील कंपनीतून देखील जात असल्याचा उलट दावा ए. एल. जी कंपनीच्या मॅनेजरने केला आहे.
कंपनीतील सांडपाणी शेजारील कंपनीच्या आवारात जात आहे. तेथून ते मोकळ्या जागेत जात आहे. यापूर्वीही या कंपनीतून अशाच पद्धतीने सांडपाणी जाऊन प्रदूषण होत होते. मात्र, बाजूच्या एका भंगार गोदामातून हे सांडपाणी जात असल्याचे भासवले जात होते. हे भंगार गोदाम एका अपघातानंतर सील करण्यात आले होते. आता येथील भंगार गोदाम खाली करण्यात आले आहे. तरी देखील सांडपाणी जाण्याचा त्रास कायम असल्याने परिसरातील रहिवाशांनी कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. चिंताजनक बाब म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळ या कंपनीवर कोणतीच ठोस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कंपनीतून बाहेर जाणारे सांडपाणी निदर्शनास आणून दिल्यानंतर या ठिकाणी क्षेत्राधिकारी म्हात्रे यांनी भेट देऊन पाण्याचे नमुने गोळा केले. पुढील कारवाई पाण्याचे नमुने आल्यानंतर केली जाईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. तर कंपनीचे मॅनेजर शिंदे यांनी हे सांडपाणी त्यांच्या कंपनीचे असल्याचे मान्य केले आणि ते कुठून जात आहे याचा शोध घेण्यासाठी बांधकाम करणाऱ्या लोकांना सांगितल्याचे म्हणाले.
(Edited by Avinash Chandane)