कर्जत : विधानसभेच्या कर्जत मतदारसंघात मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील बीड गावातील मतदान केंद्रावर अधिकारी मतदारांची दिशाभूल करत असल्याची मतदारांनी तक्रार केली. यावरून काही काळ अधिकारी आणि मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तात्काळ येथे नवा अधिकारी नियुक्त केला.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून कर्जत मतदारसंघात मोठमोठी राजकीय स्थित्यंतरे घडत गेली. कधी पक्षाचा राजीनामा, तर कधी पक्षांतर असे राजकीय नाट्य कर्जतकरांना पाहायला मिळाले. अशातच मतदानावेळी बीड मतदान केंद्रावर गोंधळ झाला. बीडमधील बूथ क्रमांक 229 मध्ये सकाळी मतदान सुरळीत सुरू होते. असे असताना मतदान अधिकाऱ्यांनी काही ज्येष्ठ मतदारांना प्रथम क्रमांकाचे बटण दाबण्यास सांगत असल्याची तक्रार उपस्थित मतदारांनी केली. यावरून वाद होऊन काही काळ येथील वातावरण तापले होते. ही बातमी समजताच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे वडील हे देखील बुथवर उपस्थित झाले. संबंधित प्रकार पाहून ते देखील आक्रमक झाले.
दरम्यान, हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांना बीड येथे बुथवर पाठवले. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी सबंधित अधिकाऱ्याची तात्काळ उचलबांगडी करत नवीन अधिकारी नियुक्त केल्याने हा वाद निवळला. मात्र यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अधिकाऱ्याची मनमानी
मी मतदानासाठी आजोबांसह गेलो होतो. बुथवरील मतदान अधिकारी आजोबांना मदत करताना त्यांना 1 नंबरचे बटण दाबा, असे सांगितल्याचे मी ऐकले. अगोदर गेलेल्या ज्येष्ठांनाही त्यांना ते 1 नंबरचे बटन दाबण्यास सांगत होते. हे चुकीचे असल्याने आम्ही तात्काळ याबाबत आवाज उठवून संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली. त्यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनीही आम्हास सहकार्य केले नाही. – रोशन रुठे, प्रत्यक्षदर्शी
ते गैरसमजामुळे…
हा प्रकार बूथ क्रमांक 229 येथे घडला. मी झोनल अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ तेथे पाठवून माहिती घेण्यास सांगितले. मतदान केंद्र अधिकाऱ्यांबाबत मतदारांचा काहीतरी गैरसमज झाल्याचे लक्षात आल्यावर आम्ही संबंधित मतदान केंद्र अधिकाऱ्यांना तेथून हलवले आणि नवीन अधिकारी नियुक्त केला.
– प्रकाश संकपाळ, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी
(Edited by Avinash Chandane)