पनवेल : रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. पनवेल, पेण आणि उरण मतदारसंघात महाविकास आघाडीतील दोन पक्ष आमने-सामने ठाकले आहेत. महायुतीला राज्यातील सत्तेतून पायउतार करण्याचा चंग बांधलेल्या महाविकास आघाडीला रायगडमध्ये एकी न करता आल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा फायदा होणार, अशी खुली चर्चा आता सुरू झाली आहे. शिवाय हे दोन्ही पक्ष अटीतटीला गेल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम वाढला आहेच शिवाय मतविभागणीचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना मिळणार आहे.
पेणमध्ये महायुतीकडून भाजपचे रवींद्र पाटील पुन्हा विधानसभेच्या मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने अतुल म्हात्रे यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रसाद भोईर यांना संधी दिली आहे.
अतुल म्हात्रे उच्चविभूषित आहेत तर प्रसाद भोईर भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या मूशीत घडलेले कार्यकर्ते आहेत. धैर्यशील पाटील शेकापमध्ये असताना प्रसाद भोईर त्यांच्यासोबत होते. पुढे ते धैर्यशील पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी थेट शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. वास्तविक भाजपचे रवींद्र पाटील यांच्याविरोधात अँटी इन्कम्बन्सीचे वातावरण असतानाच महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केल्याने याचा फायदा भाजपचे रवींद्र पाटील यांना होऊ शकतो.
हेही वाचा… Mahim Constituency : अमित ठाकरेंचे डिपॉझिट वाचले तरी…; सदा सरवणकरांची खोचक टीका
पनवेल मतदारसंघातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. इथे महायुती-भाजपचे प्रशांत ठाकूर चौथ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. पनवेलमध्येही अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा आहेच. मात्र, इथेही महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार असल्याने प्रशांत ठाकूर यांचा मार्ग आधीच सोपा झाल्याचे चित्र आहे.
शेकापचे बाळाराम पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लीना गरड यांच्यामुळे महाविकास आघाडीची मते विभागली जातील, हे साधे सत्य आहे. मात्र, शेकाप तसेच ठाकरे गट इर्षेला पेटल्याने कुणीही माघार घेतली नाही.
उरण मतदारसंघातील परिस्थिती काही वेगळी नाही. इथे महायुतीकडून भाजपने महेश बालदी यांना संधी दिली आहे. गेल्यावेळी भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि आमदारही झाले होते.
त्यांच्याविरोधात शेकापने प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी दिली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार मनोहर भोईल यांना पुन्हा संधी दिली. आगरी समाजावरील वक्तव्याने तसेच विमानतळावरून बालदी यांच्याविरोधात काहीसे वातावरण आहे. अशातच महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने महेश बालदी यांचे पारडे जड झाले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत इच्छुक होते. त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना काँग्रेसची ताकद मनोहर भोईर यांच्या पाठिशी उभी केली आहे.
पेण, पनवेल आणि उरण या तिन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार असून तिघांविरोधात महाविकास आघाडीतील अंतर्गत वादातून किंवा समन्वयाअभावी दोन उमेदवार देण्यात आले. अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी ठाकरे गटाने अलिबागसह पेण आणि पनवेलमधून शेकापसाठी उमेदवार मागे घेतले जातील, असे जाहीर केले होते. शिवाय तरीही कुणी बंडखोरी केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात अलिबागमधून ठाकरे गटाने शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्यासाठी अर्ज मागे घेतला. मात्र, पेण आणि पनवेलमधून अर्ज मागे घेतले नाहीत. याबाबत उरणमधून शेकापने त्यांचा उमेदवार मागे घ्यावा, अशी ठाकरे गटाने मागणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, उरणमधून प्रीतम म्हात्रे यांनी अर्ज मागे न घेतल्याने ठाकरे गटाने पेण-पनवेलमधील उमेदवार कायम ठेवल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी महाविकास आघाडीलमधील रायगडमधील या मतभेदांमुळे दोघांचं भांडण अन् तिसऱ्याचा लाभ, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
(Edited by Avinash Chandane)