Maharashtra Assembly Election 2024
घररायगडMaharashtra Assembly Election : रायगडमध्ये कुणाचे पारडे जड, कोण पराभवाच्या छायेत, 73...

Maharashtra Assembly Election : रायगडमध्ये कुणाचे पारडे जड, कोण पराभवाच्या छायेत, 73 उमेदवार अन् 72 तासांची प्रतीक्षा

Subscribe

पनवेल : रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील 73 उमेदवारांची मते आज (20 नोव्हेंबर) ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. आता शनिवारी (23 नोव्हेंबर) म्हणजे तब्बल 72 तासांनंतर मतमोजणी होणार आहे. निकालासाठी तीन दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे उमेदवारांची आता खऱ्या अर्थाने धाकधूक वाढली असून तोपर्यंत देवदर्शन, पूजाअर्चेवर भर देण्याकडे उमेदवारांचा कल राहणार आहे.

या सात मतदारसंघात काय घडले, कोणाचे पारडे जड आहे, कुणामध्ये कांटे की टक्कर आहे, याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. यातील कोण कुणाला भारी पडू शकतो, कुणाचा मार्ग सोपा आहे, यावर हा धावता दृष्टीक्षेप…

- Advertisement -

188 – पनवेल मतदारसंघ

पनवेलमध्ये भाजप महायुतीचे प्रशांत ठाकूर विजयाचा चौकार मारण्यासाठी तयार आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही पक्षांनी पनवेलमध्ये उमेदवार दिल्यामुळे त्यांच्यासमोर मतविभागणीचा धोका आहे. याचा भाजपचे प्रशांत ठाकूर यांचा फायदा होऊ शकतो. ठाकरे गटाच्या लीना गरड आणि शेकापचे बाळाराम पाटील यांच्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत आहे.

- Advertisement -

189 – कर्जत-खालापूर मतदारसंघ

महायुती-शिवसेनेचे महेंद्र थोरवे, महाविकास आघाडी-ठाकरे गटाचे नितीन सावंत आणि अपक्ष सुधाकरभाऊ घारे अशी तिरंगी लढत कर्जत-खालापूर मतदारसंघात आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) जय महाराष्ट्र करत सुधाकर घारे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तीन वर्षांपासून ते आमदारकीची स्वप्ने पाहात आहेत. आमदार महेंद्र थोरवे आणि घारे यांच्यातून विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. त्यातच थोरवे यांनी अनेकदा सुनील तटकरे यांच्याशीही पंगा घेतल्याने कर्जतच्या निकालाकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागलेले आहे.

190 – उरण मतदारसंघ

उरणध्ये भाजप-महायुतीचे महेश बालदी उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शेकापचे प्रीतम म्हात्रे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनोहर भोईर आहेत. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष बालदींविरोधात उभे राहिल्याने बालदी यांची बाजू काहीशी भक्कम झाली आहे. अलीकडेच आगरी समाज आणि नवी मुंबई विमानतळावरून वक्तव्यावरून आगरी समाजात काहीसे विरोधी वातावरण बालदी यांच्याविरोधात तयार झाले होते. मात्र, विरोधी आघाडीतील फुटीमुळे बालदी तरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

191 – पेण मतदारसंघ

पेणमध्ये तिरंगी सामन्याची चर्चा आहे. भाजप-महायुतीचे रवींद्र पाटील यांच्याविरोधात शेकापचे अतुल म्हात्रे आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रसाद भोईर आहेत. भाजपचे रवींद्र पाटील यांच्याविरोधात अँटी इन्कम्बन्सीचे वातावरण आहेत. असे असताना महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केल्याने याचा फायदा रवींद्र पाटील यांना होऊ शकतो. दरम्यान, पेण, उरणमध्ये शेकापने भाजप उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे बनावट पत्र व्हायरल करून संभ्रण निर्माण करण्याचा प्रयत्न मंगळवारी करण्यात आला होता. त्याविरोधात शेकापने निवडणूक आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे.

192 – अलिबाग-मु़रुड मतदारसंघ

शेकापचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जयंत पाटील यांनी चित्रलेखा पाटील यांना शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्याविरोधात उतरवले आहे. त्यामुळे इथे थेट लढत आहे. मात्र, भाजपचे दिलीप भोईर ऊर्फ छोटमसेठ यांनी बंडखोरी केल्यामुळे त्याची झळ महेंद्र दळवी यांना पोहचू शकते, अशी शक्यता आहे. बंडखोरीनंतर दिलीप भोईर यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर ठाकरे गटाने शेकापला पाठिंबा दिल्यामुळे दोन्ही उमेदवार तुल्यबळ दिसत आहेत.

193 – श्रीवर्धन मतदारसंघ

श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल नवगणे रिंगणात आहेत. मात्र, या मतदारसंघात काँग्रेसचे राजेंद्र मधुकर ठाकूर यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, पाच काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ ठाकूर यांच्या पाठिशी उभे राहिल्याने नवगणे यांची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे. तर आदिती तटकरे यांनी मतदारसंघावर पकड असल्याने त्यांच्या मताधिक्याची चर्चा मतदारसंघात रंगत आहे.

194 – महाड-पोलादपूर मतदारसंघ

शिवसेनेचे भरत गोगावले आणि शिवसेना उबाठाच्या स्नेहल जगताप यांच्यात थेट लढत महाड मतदारसंघात पाहायला मिळत आहे. गोगावले सलग तीनवेळा आमदार असून यावेळी विजयाचा चौकार मारण्याची तयारी त्यांनी केली होती. तर स्नेहल जगताप यांनीही जोरदार प्रचार केल्यामुळे ते गोगावले यांनी तुल्यबळ लढत दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच स्नेहल जगताप चमत्कार घडवणार की गोगावले विजयी चौकार मारणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -