खोपोली : कर्जत विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढलेले सुधाकर परशुराम घारे यांचा 5 हजार 694 मतांनी पराभव झाला. शिवसेना महायुतीचे महेंद्र थोरवे यांना घारे यांनी अटीतटीशी लढत दिली होती. मात्र, या निसटत्या पराभवाने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. त्यामुळे त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली असून आता कर्जत मतदारसंघात पुन्हा मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या फेरमोजणीत काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्जत खालापूर मतदारसंघातील जनता महेंद्र थोरवे यांच्या विरोधात होती. जनतेला बदल हवा होता. त्यामुळे मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कर्जत खालापूरमधील जनता आम्ही सुधाकर घारे यांना मतदान केल्याचे सांगत असताना निकाल वेगळा लागला कसा लागला? असा प्रश्न सुधाकर घारे यांनी उपस्थित केला होता. खोपोलीमध्ये मतदानाच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचे निवडणूक अधिकार्यांनी कबुल केल्याचा सुधाकर घारे यांचा दावा आहे. असे अनेक संशयास्पद मुद्दे दाखवून सुधाकर घारे यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती.
विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदारसंघातून शिवसेनेचे विजयी महेंद्र थोरवे यांना 94 हजार 871 मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकांची 89 हजार 177 मते सुधाकर घारे यांना मिळाली. घारे यांचा अवघ्या 5 हजार 694 मतांनी पराभव झाला. एकूण 26 पैकी 22 फेर्यांमध्ये सुधाकर घारे आणि विजयी उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यात जोरदार रस्सीखेच होती.
खोपोली नगरपालिका हद्दीत थोरवे यांनी आघाडी घेतल्याने खोपोलीत काहीतरी गडबड झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे घारे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने सुधाकर घारे यांची मागणी मान्य केली आहे. आता ही मतमोजणी कधी होणार आणि फेरमोजणीनंतर निकालात काही फरक पडेल का, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
(Edited by Avinash Chandane)