अविनाश चंदने : आपलं महानगर वृत्तसेवा
पनवेल : राज्यात सर्वत्र लाडक्या बहिणींचा बोलबाला सुरू आहे शिवाय मतदारांमध्येही जवळपास 50 टक्के महिला आहेत. असे असताना रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांना मिळालेले स्थान पाहता चिंता वाटावी अशीच स्थिती आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 73 उमेदवार असून त्यात अवघ्या 10 महिला उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगडमध्ये 5 उमेदवार दिले असून त्यात दोन महिला आहे, तर बसपाने 3 महिला उमेदवार दिले आहेत, हे विशेष.
रायगड जिल्ह्यात एकूण 7 मतदारसंघ आहेत. यातील कर्जत-खालापूर मतदारसंघात 9 उमेदवार असून त्यात एकही महिला उमेदवार नाही. त्यामुळे महिलांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि कर्तृत्व असूनही डावलले जात असल्याची चर्चा सध्या रायगडमध्ये सुरू आहे. एकमेव महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघात एकूण पाच उमेदवारांपैकी तीन महिला उमेदवार आहेत. मात्र, इतर मतदारसंघात महिला उमेदवार अगदी नगण्य आहेत. असे असले तरी रायगडमधील या चारचौघी मात्र चर्चेत आहेत. पनवेल मतदारसंघातील लीना गरड, अलिबाग-मुरुड मतदारसंघातील चित्रलेखा पाटील, श्रीवर्धन मतदारसंघातील अदिती तटकरे आणि महाड-पोलादपूर मतदारसंघातील स्नेहल जगताप या बाजी मारणार का, याकडे रायगडवासीयांचे लक्ष लागले आहे.
आदिती तटकरे
राजकारणाचे बाळकडू प्यायलेल्या अदिती तटकरे यांच्याकडे राजकारणासोबत समाजकारणाचा जबरदस्त अनुभव आहे. एवढे असूनही त्यांचा स्वभाव नम्र आहे. महायुती सरकारमध्ये त्या महिला व बालकल्याण मंत्री असून याच विभागाकडून लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. रायगडच्या पालकमंत्री तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या असल्या तरी राजकारण त्यांचे स्वत:चे अस्तित्व आहे. 35 वर्षांच्या, एमए झालेल्या तसेच उत्तम जनसंपर्क, समाजकारणाची रुची असलेल्या अदिती तटकरे यांचे श्रीवर्धन मतदारसंघात पारडे जड आहे.
लीना गरड
पनवेल मतदारसंघात लीना गरड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहेत. त्या नवी मुंबईतील खारघरच्या रहिवासी असून पनवेल महापालिकेत नगरसेविका होत्या. बीएससी झालेल्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या 46 वर्षीय लीना गरड या आधी भाजपमध्ये होत्या. राजकारणात तसेच विधानसभेत आपली छाप उमटवू शकतील, असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. पनवेल मतदारसंघात त्यांची लढत भाजप-महायुतीचे मातब्बर उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्याशी आहे तर मविआचे घटक असलेल्या शेकापने पनवेलमध्ये बाळाराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने लीना गरड चमत्कार घडवणार का, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.
स्नेहल जगताप
शिवसेनेतील बंडखोरीनंतर भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातून स्नेहल जगताप यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे माणिकराव जगताप यांच्या त्या कन्या असून त्यांनी महाडचे नगराध्यक्षपद भूषवले आहे. 35 वर्षीय स्नेहल जगताप बीएससी झाल्या असून राजकारणाचा त्यांना अनुभव आहे. शिवसेनेचे भरत गोगावले सलग तीन वेळा या मतदारसंघातून आमदार असूनही स्नेहल जगताप यांनी त्यांच्यासमोर जबरदस्त आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत गोगावले यांना विजयी चौकार मारण्यापासून रोखून महाडमधून प्रथमच महिला आमदार निवडून येणार का, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
चित्रलेखा पाटील
शेकापने महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून चित्रलेखा पाटील यांना अलिबाग-मुरुड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अलिबाग नगरपरिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्या पत्रकारिकेतील पदवीधर आहेत. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या स्नूषा असल्या तरी त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अगदी झपाटल्यागत मतदारसंघ पिंजून काढला आहे. आक्रमक आणि तेवढ्याच नम्र असलेल्या चित्रलेखा पाटील मतदारसंघात चिऊताई म्हणूनही ओळखल्या जातात. 2019 मध्ये शिवसेनेने जिंकलेले अलिबाग परत मिळवण्यासाठी 37 वर्षीय चित्रलेखा पाटील यांनी महेंद्र दळवी यांना जोरदार लढत दिली आहे. त्यामुळे या जागेचा निकाल राज्यासाठी खास असेल.
इतर महिला उमेदवार
उरण मतदारसंघात नीलम मधुकर कडू आणि श्रीकन्या तेजस डाकी अशा दोन अपक्ष उमेदवार आहेत. तर बसपाने तीन महिला उमेदवार जिल्ह्यात दिल्या आहेत. त्यात पेणमध्ये अनुजा केशव साळवी, महाड-पोलादपूरमध्ये अमृता अरुण वाघमारे आणि श्रीवर्धनमधून अश्विनी उत्तम साळवी यांचा समावेश आहे. या शिवाय महाड-पोलादपूर मतदारसंघातून प्रज्ञा लक्ष्मण खांबे या अपक्ष उमेदवार आहे.